निगडी:
ज्ञान प्रबोधिनी निगडी व चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने इ. ६ वी चे निवासी शिबिर दि.३, ४ व ५ मे २०२३ या कालावधीत चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोरी येथे आयोजित करण्यात आलेले होते.
या शिबिरात  २० मुली, १७ मुले व चैतन्य विद्यालयाचे ४ मुली, २ मुले असे एकूण ४३ विद्यार्थी आणि ७ अध्यापक सहभागी होते.

शिबिराचा पहिला दिवस:
पार्श्व प्रज्ञालय तळेगाव येथे पार्श्वनाथांचे, वर्धमान महावीर स्वामींचे दर्शन घेऊन, पार्श्व प्रज्ञालयाचा इतिहास जाणून घेऊन सर्व विद्यार्थी व अध्यापक चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये पोहोचले.
अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे. सर्व व्यवस्थांनी सुसज्ज अशी इमारत आहे. चैतन्य गगनगिरी महाराजांच्या स्मृतींनी पावन झालेला परिसर आहे.

दुपारच्या भोजन व विश्रांतीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी चैतन्य विद्यालयात असलेल्या शैक्षणिक बाबींची जसे की कम्प्युटर लॅब, लायब्ररी, वर्गखोल्या, विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यालयाचा परिसर फिरून पाहिला. परिसरात लावलेले वृक्ष, गोपालन, मैदान, शेती इत्यादी बद्दल माहिती जाणून घेतली. विद्यालयातील अध्यापिका प्रियांकाताई यांनी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

त्यानंतर सर्व विद्यार्थी इंद्रायणी नदीवर असलेल्या रांजणखळग्यांचे निरीक्षण करण्यासाठी आले. छाती एवढ्या पाण्यात सुरक्षितपणे भिजण्याचा, पोहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. रांजणखळगे नेमके कसे तयार होतात त्याबद्दलची माहिती जाणून घेऊन विद्यार्थ्यांनी रांजणखळग्यांचे निरीक्षण केले.

त्यानंतर सिमेंट व दगडाची पावडर यांपासून विटा बनवण्याचा कारखाना विद्यार्थ्यांनी पाहिला. भुईमुगाची शेती, स्ट्रॉबेरीची शेती विद्यार्थ्यांनी पाहिली. स्ट्रॉबेरीची रोपे कशी असतात कशी लावली जातात त्यास खते व पाणी कसे दिले जाते स्ट्रॉबेरी झाडाला येती कशी इत्यादी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या. त्यानंतर कुक्कुटपालन, शेळीपालन व वीटभट्टी बद्दलची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण करत, प्रश्न विचारत जाणून घेतली.

विद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मावळत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेत सूर्यास्त अनुभवला. विद्यार्थ्यांसाठी ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हा खेळ घेण्यात आला. समोरच्या विद्यार्थ्यांने मागील विद्यार्थ्यांकडे हाताच्या प्रसाद मधील पाणी सोपवायचे असे करत करत शेवटच्या विद्यार्थ्यांने एका वाटीत त्याचा संग्रह करायचा अशा प्रकारचा हा खेळ आहे.
वरील उक्तीचा अनुभव विद्यार्थ्यांना या खेळाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मिळाला.

त्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यालयाच्या परिसरात असलेल्या औदुंबराच्या झाडापाशी संध्या करण्यासाठी जमले. दीप प्रज्वलन करून संध्या केली गेली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी संधेचा अनुभवही व्यक्त केला.चैतन्य विद्यालयाचे संस्थापक मा. श्री.भगवान शेवकर सर यांनी शाळा सुरू होण्यापूर्वीची पार्श्वभूमी आणि होत गेलेला उत्कर्ष विद्यार्थ्यांच्या समोर मांडला. तसेच विद्यालयाचे उद्दिष्ट, विद्यालयात सुरू असलेले मनुष्य घडणीचे प्रयत्न आणि मनुष्य जीवन कशासाठी यासंबंधी विद्यार्थ्यांच्या समोर मांडणी केली.

रात्री भोजनानंतर श्री. समाधान सुसर यांनी विनोदी कथा सांगून विद्यार्थ्यांना हास्यरसाचा अनुभव दिला. रात्री दैनंदिन लिहून सर्व विद्यार्थ्यांनी आराम केला.

शिबिराचा दुसरा दिवस:
स. ५:३० वा. सर्व विद्यार्थी झोपेतून जागे झाले. स. ५:५५ वा. उगवत्या सूर्याचे सर्वांनी दर्शन घेतले. सर्व विद्यार्थ्यांनी व्यायाम केला, सूर्यनमस्कार घातले. डॉजबॉल आणि राम राम पाहुणे हे खेळ खेळून विद्यार्थी स्नानासाठी गेले. न्याहारीनंतर सर्वजण आदर्श गाव कानेवाडी येथे भेट देण्यासाठी गेले.

गावचे सरपंच मा. श्री. नवनाथ पवार, उपसरपंच मा. सौ. स्वातीताई येवले यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना गाव फिरून दाखवले. कुलदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन नळ मीटर द्वारे होणारा पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण तंत्र, आरोग्य सुविधा, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, शालेय बालोद्यान व पक्षीउद्यान इत्यादी बाबी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण करून समजून घेतल्या.

गावातील स्वच्छता, रस्ते व घरांची रचना, प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय हे सारे अवाक करणारे आहे.
ग्रामपंचायत मध्ये सरपंच मा. श्री. नवनाथ पवार साहेब आणि ग्रामविकास अधिकारी मा. श्री. हुलगे साहेब यांची मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांनी गावातील विकास कामे आणि या कामामागची प्रेरणा जाणून घेतली. तसेच गावाबद्दलचे एक व्हिडिओही पाहिला.

त्यानंतर सर्व विद्यार्थी श्री. श्रीकांतजी ढोरे यांच्या शेतात आले. निशिगंधाची फुलशेती, बाजरी, ऊस व काकडी या पिकांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. श्री मयुरेश ढोरे यांनी दुग्धपालनाबद्दल व म्हशींच्या जातींबद्दल माहिती दिली. सरबताचा आस्वाद घेऊन
सर्व विद्यार्थी तोलानी मरीन इंजीनियरिंगमध्ये आले.

प्रशस्त सभागृहात एक व्हिडिओ दाखवत श्री. विनोद सरांनी या कॉलेज बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्व विद्यार्थ्यांनी लायब्ररी बघितली. व्हिडिओच्या माध्यमातून भासमान ऑस्ट्रेलिया जवळून जहाजातून प्रवासही केला. त्यानंतर प्रत्यक्ष जहाजाचे इंजिन पाहिले व तेथील व्यवस्था समजून घेतल्या. पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी हा अनुभव घेतला.

दुपारी सर्व विद्यार्थी इंदुरी गावातील इंद्रेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेरील निसर्गरम्य परिसराचे निरीक्षण करत होते.
पालक महासंघाचे अध्यक्ष श्री. निलेशजी गावडे यांनी विद्यार्थ्यांना तळेगाव व परिसराचा इतिहास आणि या मंदिराचा इतिहास सांगितला. त्यानंतर सर्व विद्यार्थी इंदुरी च्या भुईकोट किल्ल्यात आले. या किल्ल्याची रचना, बांधकाम, इतिहास श्री. गावडे सरांनी विद्यार्थ्यांना उलगडून दाखवला.

विद्यालयात आल्यावर विद्यार्थ्यांसाठी कान्हेवाडी येथील भैरवनाथ भजनी मंडळ यांचे सांप्रदायिक भजन योजलेले होते.
अतिशय भक्तिमय वातावरणात हे भजन संपन्न झाले. थोड्या गमती जमती ऐकून, दैनंदिनी लिहून विद्यार्थी झोपी गेले.

शिबिराचा तिसरा दिवस:
स. ५:३० वा. सर्व विद्यार्थी झोपेतून जागे झाले. सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन मैदानावर व्यायामासाठी गेले.
चैतन्य विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. वेद पटेल सरांनी विद्यार्थ्यांचा व्यायाम घेतला. त्यानंतर लेख क्रिकेटचा खेळ विद्यार्थी खेळले आणि स्नानासाठी गेले.
न्याहारीनंतर सर्वजण तळेगाव येथील ऐतिहासिक केदारेश्वराच्या मंदिरात आले.

केदारेश्वराचे दर्शन घेऊन तेथील मंदिराची रचना गोमटाची विहीर पाहून सावलीला स्थानापन्न झाले. इतिहास अभ्यासक डॉ. प्रमोदजी बोराडे यांनी विद्यार्थ्यांना या मंदिराचा इतिहास व परिसराचा इतिहास सांगितला. त्यांच्या समवेत श्री. संजयजी दाभाडे, श्री. निलेशजी उपस्थित होते.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी बामनडोह बघितला. बनेश्वराचे दर्शन घेऊन सरसेनापती खंडेराव दाभाडे, उमाबाई दाभाडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. श्री. प्रमोदजी बोराडे यांनी येथील इतिहासही समजावून सांगितला.

त्यानंतर सर्वांनी बनेश्वराच्या मंदिरात उपासना केली. श्री. निलेश गावडे यांनी बनेश्वर मंदिराची बांधकाम रचना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत शंका निरसनही केले.
दुपारी भोजनानंतर साहित्याची आवरावर व स्वच्छता करून समारोपाच्या कार्यक्रमासाठी सर्वजण जमले. यावेळी चैतन्य विद्यालयाचे संस्थापक मा. श्री भगवान शेवकर सर,प्राचार्या मा. जे. सी. रॉय मॅडम, विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात काय अनुभवले याबद्दल आठ विद्यार्थ्यांनी, दोन अध्यापकांनी आपली मनोगत व्यक्त केली. रॉय मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शेवकर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा शिबिरांच्या माध्यमातून आपण जे जे काही अनुभवत आहात त्याचा उपयोग आयुष्यात तुम्हा सगळ्यांना होईल आणि तुम्ही गेल्यानंतर मला तुमची सतत आठवण येत राहील असे सांगितले.

त्यानंतर सर्वजण ज्ञान प्रबोधिनी गुरुकुलचे माजी विद्यार्थी श्री. प्रशांतदादा निकम यांच्या गुलाबाच्या फुल शेतीमध्ये आले. गुलाबाच्या आठ प्रकारच्या जाती, सहा रंग, लागवडीची पद्धत, फुले काढणे, ठेवणे व विक्रीची पद्धत विद्यार्थ्यांनी समजून घेतली.
प्रशांत दादाने अतिशय अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि खाऊ व फुलेही भेट दिली.

त्यानंतर विश्वरेखा फ्लोरिकल्चर येथे श्री. सदानंद सर यांनी शोभेची झाडे, त्यांची लागवड, या झाडांचे विविध प्रकार यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
सर्वजण पद्य म्हणत व घोषणा देत परतीच्या प्रवासाला लागले. प्रार्थना घेऊन या शिबिराचा शेवट झाला.
विविध गोष्टींचा अनुभव घेतल्याने विद्यार्थी पालकांशी भरभरून बोलत होते. चैतन्य विद्यालयात मा. श्री. भगवान शेव सर यांच्या नियोजनात झालेली व्यवस्था उत्तम होती.
शिबिरात सहभागी सर्वच अध्यापकांच्या सहकार्याने आणि उत्साही विद्यार्थ्यांच्या सहभागाने हे शिबिर अतिशय यशस्वी झालेले आहे.

या शिबिराचे शिबिर प्रमुख म्हणून श्री. समाधान सुसर आणि सहाय्यक प्रमुख श्रीमती बबीताताई आंबेकर यांनी काम पाहिले. तसेच श्री. अतुल भोसले, सौ. प्रियांका शिवेकर, सौ. स्मिता माने, सौ. उर्मिला बेल्हेकर, श्री. अमेय गुर्जर, देवव्रत मुणगेकर हे अध्यापक सहभागी होते.

error: Content is protected !!