प्रतिष्ठा – एक अटळ महत्वाकांक्षा!
‘प्रतिष्ठा’ प्राप्तीसाठी अबालवृद्ध मानवजात शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत असते!
कशी प्राप्त होते प्रतिष्ठा ?
तिचे प्रकार तरी किती आणि काय काय असू शकतात ?
प्रतिष्ठा हा शब्द जेव्हापासून माझ्या कानावर आला तेव्हापासून माझ्या मनाभोवती अनेक प्रश्नांनी फेर धरला!
कदाचित आपल्या मनातही हेच प्रश्न येत असेल !
प्रतिष्ठेची सुरुवात प्रत्यक्ष व्यक्तीपासून सुरू होते!
त्या व्यक्तीच्या मनात असलेली स्वतःची प्रतिष्ठा, राजकीय वर्तुळातील प्रतिष्ठा ,अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठेची रूपे आपण नेहमीच पाहतो!अनुभवतो- या प्रतिष्ठेच्या प्राप्तीसाठी आपण सुरुवात कशी करतो? त्याच्यासाठी काय धडपड करतो, कष्ट करतो? हा ही एक अभ्यासाचा विषय आहे!
प्रतिष्ठा कुठलीही असो पण ती प्राप्त करण्यासाठी त्याला त्याग, समर्पण, कष्ट ,अभ्यास या सर्वांची नितांत आवश्यकता आहे!
‘असाध्य ते साध्य करिता
सायास– कारणे अभ्यास
तुका म्हणे!
म्हणजे प्रयत्न तर असावेच पण ते अभ्यासपूर्ण असावेत आणि असे अभ्यासपूर्ण असतील तर निश्चितपणे आपल्याला आपले ध्येय गाठता येईल!
प्रतिष्ठा म्हटली की ती चांगलीच प्रतिष्ठा अपेक्षित आहे! पण, तिचा अतिरेक झाला तर तिलाच जपण्यासाठी आपल्या हातून अघोरी कृत्य देखील होऊ शकतात आणि ती प्रतिष्ठा जपण्यासाठी काही दुर्दैवी अंतकरण विदीर्ण करणाऱ्या घटना वर्तमानपत्रात वाचायला मिळतात!
धनगर कुटुंबात जन्मलेल्या एका मुलीने पाटील कुटुंबात जन्मलेल्या मुलाशी प्रेम विवाह करण्याचे ठरविले, याची कुणकुण आपली प्रतिष्ठा जपणाऱ्या या मुलीच्या वडिलांना लागली! त्याने आपल्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला! पण ,ज्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की ही आपली मुलगी आपल्या निर्णयावर ठाम आहे त्या क्षणी त्यांनी स्वतःच्या हाताने आपण जन्माला घातलेल्या मुलीची निर्घुण हत्या केली!
अशा घटनांना
” HONOUR KILLING” असे म्हटले जाते!
या प्रतिष्ठेच्या मागे लागून त्या पित्याने काय साधले?
अतिशय निष्पाप जन्माला घातलेल्या आपल्याच मुलीचा खून आपण स्वतः केला ही जखम आयुष्यभर घेऊन तो तुरुंगात सक्तमजुरीची शिक्षा भोगणार!
त्या मुलीचा प्रेमी आपल्या प्रेयसीच्या विरह यातना भोगणार!
कुटुंबातील प्रमुख पुरुष यावेळी तुरुंगात जाईल त्यावेळी संपूर्ण कुटुंब कोसळणार!
हे सर्व अत्यंत सुन्न करणार आहे!
माणसाने समाजात आपली प्रतिमा उंचावण्यासाठी प्रतिष्ठा मिळवावी कारण तुम्हाला समाधानाने जगण्यासाठी हीच प्रतिष्ठा एक आत्मिक बळ देते!
समाजातील इतर घटकांसमोर एक आदर्श ठेवते!
पिढ्यानपिढ्या यांनी प्राप्त केलेली प्रतिष्ठा त्या घराण्याच्या नावलौकिकात भर घालते!
अशी प्रतिष्ठा कोणाला मिळवावीशी वाटणार नाही हो?
होय! ती प्राप्त होईल अशी इच्छा प्रत्येकाला मनापासून वाटेल आणि तो त्या दृष्टीने प्रयत्नशील पण राहील! परंतु ती मिळेपर्यंतचा- प्राप्तहोईपर्यंतचा जो प्रवास आहे तो मात्र त्याला सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून करणच जरुरी आहे!
सामाजिक प्रतिष्ठा आपले शिक्षण घेतल्यानंतर ,स्वतःच्या पायावर उभी राहिल्यानंतर या समाजानेच मला इथपर्यंत आणलेलं आहे- त्या समाजाचे उतराई होण्यासाठी तो कार्यप्रवृत्त होतो!
सामाजिक कार्य करण्यासाठी तो एखाद्या सामाजिक संस्थेचा सक्रिय सभासद होतो!
त्याच्या माध्यमातून तो वेगवेगळी आरोग्य शिबीर भरवतो! ,रक्तदान करतो, स्वतः बुद्धी, पैसा आणि वेळ देऊन इतरांसाठी(Time, Talent) मदतीचं कार्य करतो!
आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना रोजगार मिळवून देणे! कोणाला वैद्यकीय शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी मदतीचा हात पुढे करणं! एखाद्या कौटुंबिक दुखाच्या क्षणी अपघाती अकाली मृत्यू झालेल्या त्या कुटुंबाला सावरण्यासाठी समर्थपणे त्याच्या मागे उभे राहून आपल्या सामाजिक योगदानाचा दर्शन घडवतो!
ही त्याची कृती समाज संवेदनशील असल्यामुळे तो डोळसपणे टिपत असतो आणि मग हळूहळू त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा त्याला प्राप्त होते!
हे एका दिवसात घडत नाही त्याला अनेक महिने आणि वर्ष जावे लागतात!
त्यात त्याचं सातत्य लागतं, या सर्व अवस्थेतून तो जात असताना त्याला अप्रत्यक्षरीत्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते! बाकी भाग पुढील अंकात-( शब्दांकन-ला.डॉ. शाळीग्राम भंडारी)
- अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची आमदार शेळकेंवर तीव्र टीका
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी