
सावरकरांचे अंधभक्त बनू नका: योगेश सोमण
छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला – पुष्प दुसरे
पिंपरी:
“स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंधभक्त बनू नका; ‘माफीवीर’ म्हणून कोणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास वितंडवाद न घालता अत्यंत तार्किक पद्धतीने अन् शांतपणे त्यांच्या टिकेला उत्तर द्या!” असे प्रतिपादन प्रथितयश अभिनेता योगेश सोमण यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित पाच दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत ‘आजच्या परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेताना…’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना योगेश सोमण बोलत होते. जनसेवा सहकारी बँकेचे संचालक राजन वडके, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
योगेश सोमण पुढे म्हणाले की, “अलीकडच्या काळात देश पातळीवर केलेल्या एका सर्वेक्षणात ५४ टक्के लोकांनी विनायक दामोदर सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर’ होते आणि २० टक्के लोकांनी ते प्रखर देशभक्त होते, असे ठाम मत व्यक्त केले आहे. काही लोकांसाठी हे सर्वेक्षण भीतिदायक असल्याने तसेच आगामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत आपल्या अस्तित्वाची खात्री नसल्याने एक व्यक्ती वेळोवेळी त्यांचा ‘माफीवीर’ म्हणून उल्लेख करते.
वास्तविक न्यायालयाकडून जामीन मिळावा म्हणून धावपळ करणारी ती व्यक्ती सावरकरप्रेमींचा राग उफाळून यावा म्हणून डिवचण्याचा प्रयत्न करीत असते.
भारतीय इतिहासात चापेकर बंधू आणि सावरकर बंधू तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठी केलेले सर्वार्पण सर्वज्ञात आहे. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी मार्सेलिस येथील समुद्रात उडी घेऊन स्वतःला फ्रान्स पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला होता.
दोन वेळा जन्मठेपेची एकत्रित पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यानंतर विचलित न होता अंदमानच्या प्रथम दर्शनानंतर येथे स्वतंत्र भारताचा सर्वात प्रबळ नाविक तळ होऊ शकतो, असे निर्भय विचार त्यांच्या मनात आले होते. अंदमान येथील कारागृहातील अकरा वर्षांच्या कालावधीत सावरकरांनी कैद्यांच्या साक्षरतेविषयी जे अतुलनीय कार्य केले, त्या एकाच कार्यासाठीदेखील त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळायला हवा. सावरकर हे एक राजकीय नेते होते; तसेच कायदेतज्ज्ञसुद्धा होते.
त्यामुळे त्यांनी आपल्या सहकारी कैद्यांसह आपल्याला शिक्षेतून सुटका मिळावी या न्याय्य हक्कासाठी दहा वेळा कायदेशीर भाषेत आवेदनपत्रे लिहिली होती. त्यांच्या समकालीन नेत्यांनीही अशी आवेदनपत्रे ब्रिटिश सरकारला लिहिली आहेत. सावरकरांनी ही आवेदनपत्रे ‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रपर ग्रंथात नमूद केली आहेत. मात्र, इतिहासाचा नवा शोध लावल्याचा आव आणून या आवेदनपत्रांविषयी सातत्याने खोडसाळ अपप्रचार केला जातो.
अंदमानच्या कारागृहात दहा हजार ओळींची साहित्यनिर्मिती स्मरणात ठेवणारे सावरकर आणि लिहून दिलेल्या दहा ओळी धडपणे न वाचता येणारी व्यक्ती यांची तुलना होऊच शकत नाही.
झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते; परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला जागे करता येत नाही म्हणून सावरकर समजून घेताना भाबडेपणा करू नका; तसेच त्यांना देवत्वही बहाल करू नका. अन्य कोणत्याही देशभक्तांबरोबर त्यांची तुलना करू नका. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य, समाजकार्य, प्रखर हिंदुत्व, उच्च दर्जाचे साहित्यसर्जन, त्याग अशा बहुविध पैलूंचा अभ्यास करून जनमानसात पुन्हा एकदा ‘मृत्यूंजय’ सावरकर पोहोचवा!” असे आवाहन योगेश सोमण यांनी केले.
अश्विनी अनंतपुरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. हर्षदा पोरे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
- फॅशन फ्युजन फेस्टिवल सिझन
- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे
- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत ‘ पवना विद्या मंदीर प्रथम
- येळसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मणिषा ठाकर बिनविरोध
- जांभूळच्या ग्रामविकास अधिकारी कल्याणी लोखंडेंना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार



