
अभिवाचनाच्या आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
पिंपरी:
रुद्रंग, निगडी (पुणे) या संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या ‘लागले खूळ कलावंताला…!’ (भाग २) या वैविध्यपूर्ण अभिवाचनाच्या आविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
ज्येष्ठ अभिनेता यशोधन बाळ, ‘दॅट ब्रोकन विंडो’ या आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक सुमीत पोफळे, चित्रपटाच्या कथा, पटकथा, संवाद लेखिका मैथिली रमेश, इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ एफ. एम. निर्माती माधुरी ढमाले, ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुद्रंगचे संस्थापक रमेश वाकनीस यांची निर्मिती संकल्पना, संहितालेखन, दिग्दर्शन या माध्यमातून मराठीतील निवडक अभिजात साहित्यकृतींना विविध अभिवाचकांनी आपल्याला कायिक अन् वाचिक अभिनयातून साकार केले. त्यासाठी सागर यादव, मोनिल जोशी, शशिधर बडवे, मोनिका बागडे, रमेश वाकनीस, उज्ज्वला केळकर, स्मिता कुलकर्णी यांचा वाचकस्वर लाभला.
‘पाताळघरातले निरांजन’ या शीर्षकाखाली बा. सी. मर्ढेकर आणि नारायण सुर्वे या दोन कविश्रेष्ठांच्या कवितांचा अनुबंध उलगडण्यात आला. ‘समजत नाही तर समजून घेऊ…’ या संकल्पनेंतर्गत मूळ हिंदी कवितांच्या अनुवादित कवितांवर आधारित स्त्रिया, स्त्रिया, स्त्रिया…!’ या चर्चानाट्यातून स्त्रीच्या अंतरंगाचे अंतर्मुख करणारे दर्शन घडविण्यात आले.
मानसी चिटणीस लिखित ‘ओरिगामीची फुले’ या कथा अभिवाचनातून हृदयस्पर्शी भावनाविष्कार करण्यात आला. ‘झोपा आता गुपचूप!’ या अशोक पाटोळे लिखित विनोदी नाटिकेच्या खुसखुशीत वाचनाने निखळ हास्यानंदाचा परिपोष केला. प्रत्येक सत्राच्या प्रारंभी किशोरी सरीन आणि नंदकुमार कांबळे यांनी अभिजात मराठी आणि हिंदी गीतांचे सुरेल सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या दरम्यान विविध साहित्य संस्था आणि व्यक्तींचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. त्यामध्ये राज अहेरराव (नवयुग साहित्य व शैक्षणिक संस्था), चंद्रशेखर जोशी (शब्दरंग साहित्यकट्टा), संदीप जाधव (गझलपुष्प), सविता इंगळे (स्वयंसिद्धा प्रतिष्ठान), शर्मिला महाजन (अनुष्का स्त्री कलामंच), राजेंद्र घावटे (पिंपरी – चिंचवड साहित्य मंच), मंगला सरीन (दिवंगत कामगारनेते सुभाष सरीन यांच्या अर्धांगिनी), मानसी चिटणीस (लेखिका) यांचा समावेश होता.
नटराज पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश वाकनीस यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार मुरडे, नागेश जोशी यांनी संयोजनात सहकार्य केले. माधुरी ओक यांनी सूत्रसंचालन केले. अरुणा वाकनीस यांनी आभार मानले.
- फॅशन फ्युजन फेस्टिवल सिझन
- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे
- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत ‘ पवना विद्या मंदीर प्रथम
- येळसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मणिषा ठाकर बिनविरोध
- जांभूळच्या ग्रामविकास अधिकारी कल्याणी लोखंडेंना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार



