
पथनाट्यातून दिला पाणीबचतीचा संदेश
पिंपळे गुरव:
दिलासा संस्था, मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या सामाजिक संस्थांच्या वतीने उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर प्रकाश टाकणारे “पानी रे पानी तेरा रंग कैसा?” हे पथनाट्य रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी सादर करून पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात जनतेचे प्रबोधन करण्यात आले.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, सुभाष चव्हाण, नंदकुमार कांबळे, संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्त्व विषद केले.
वाढत्या उन्हाळ्यात ‘पाणी जपून वापरावे!’ , ‘आज जल है तो कल हम है!’ , ‘थेंब थेंब पाणी वाचवा!’ , ‘पाणी वाचवण्याचा ठेवा ध्यास, मगच होईल आपला विकास!’ , ‘पाण्याचे करा संरक्षण तरच वसुंधरेचे होईल रक्षण!’ अशी घोषवाक्य म्हणत जनजागृती करण्यात आली.
संगीता जोगदंड आणि आण्णा जोगदंड या दांपत्याने पाण्यासाठी झुंबड झाल्यावर होणाऱ्या भांडणाचा प्रसंग कळशी, हंडा घेऊन सादर केला. कवी शामराव सरकाळे यांनी अंगावरील कपड्यांवर पाणीबचतीचे संदेश लिहून उपस्थितांचे लक्ष वेधले.
वसुंधरा पर्यावरण प्रतिष्ठान पिंपरी – चिंचवड शहराचे अध्यक्ष गुणवंत कामगार तानाजी एकोंडे या प्रसंगी म्हणाले की, “सध्या आपल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सूर्य आग ओकत आहे. कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी कमी होत आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. गरजेपेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे. यासाठी सर्व नागरिकांनी पाणी जपून वापरायला शिकले पाहिजे. गळके नळ बदलावेत, किमान उन्हाळ्यात तरी गाड्या धुवू नयेत, पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करू नये. पाणी जीवन आहे!” असे विचार मांडले.
पटनाटयामध्ये सुरेश कंक, आण्णा जोगदंड, शामराव सरकाळे, संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी, नंदकुमार कांबळे, सुभाष चव्हाण यांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी श्रीकांत चौगुले, डॉ. पी. एस. आगरवाल, प्रदीप गांधलीकर, गजानन धाराशिवकर, प्रताप साबळे, अशोकमहाराज गोरे, जयश्री गुमास्ते, एकनाथ उगले, सुंदर मिसळे, दिलीप कांबळे, बाळासाहेब देवकर, गणेश गडगे, अरविंद मांगले, गजानन धाराशिवकर, प्रमोद माने, श्रावणी अडागळे, राजू कुंभार, शोभा माने, प्रकाश बंडेवार आणि हास्य क्लब सदस्य उपस्थित होते. पथनाट्य झाल्यावर पाणी बचतीची सामूहिक शपथ आण्णा जोगदंड यांनी उपस्थित नागरिकांना दिली.
- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत ‘ पवना विद्या मंदीर प्रथम
- येळसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मणिषा ठाकर बिनविरोध
- जांभूळच्या ग्रामविकास अधिकारी कल्याणी लोखंडेंना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार
- मावळ तालुक्यात दहावी ची परीक्षा सुरळीत सुरु, मावळ तालुक्यातून सात हजार चाळीस परीक्षार्थी
- शिवज्योत दौड, महाआरती, भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, महाप्रसाद कार्यक्रमांसह शिवजयंती साजरी



