सकस साहित्य सुदृढ समाजमन घडवते
जागतिक पुस्तकदिनानिमित्त चिंचवडगावात पुस्तक प्रदर्शन
पिंपरी:
“सकस साहित्य सुदृढ समाजमन घडवते. वाचनाने जीवनातील सर्व प्रकारचे ताणतणाव कमी होऊन व्यक्तिमत्त्व विकसित होते, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले आहे.

अक्षय्य तृतीया आणि जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून अक्षरग्रंथ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना अरुण बोऱ्हाडे बोलत होते.

यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे – पाटील, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, इतिहास अभ्यासक संदीप तापकीर आणि ब. हि. चिंचवडे यांची व्यासपीठावर तसेच ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, प्रकाशक नितीन हिरवे, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, जलसंपदा अभियंता ज्ञानदेव काळे  उपस्थितीत होते.

श्रीकांत चौगुले यांनी, “ढवळे ग्रंथयात्रेपासून मराठी साहित्यविश्वात ग्रंथ प्रदर्शनाची सुरुवात झाली. साहित्यप्रसाराचे माध्यम म्हणून आजपर्यंत ग्रंथ प्रदर्शनांनी मोलाची कामगिरी बजावली आहे!” अशी माहिती दिली. “मोबाइलमध्ये गुंतलेल्या तरुणाईला पुन्हा पुस्तकांकडे वळवणे हे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर ग्रंथ प्रदर्शन आयोजित करणे हे धाडसाचे काम आहे; परंतु स्थानिक नेतृत्व, प्रकाशक आणि वाचक यांच्या समन्वयातून वाचनचळवळ वृद्धिंगत होऊ शकते!” असे मत संदीप तापकीर यांनी व्यक्त केले.

चित्रसेन गोलतकर यांनी स्वागत केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा गोलतकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!