“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १४ वा”

एकदा का सत्य नामस्मरणाला सुरूवात झाली की, …. ते अमित-अगणित होऊ लागते. *माझी मज झाली अनावर वाचा।* *छंद या नामाचा घेतलासे।।*

अशी स्थिती होते.

अशा नामधारकाकडे कलिकाळ वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत. कली म्हणजे “द्वेष-दुजेपणा” व काळ म्हणजे “मृत्यू”. या दोन्हींचे मूळ द्वैतबुद्धीत आहे.

”मी” जगापासून वेगळा आहे, “मी” देहाएवढा आहे, या जीवाच्या कल्पनेमुळे त्याच्या ठिकाणी “मी-माझे”, व “तू-तुझे” असा “द्वैतभाव” निर्माण होतो. यालाच “कली” असे म्हणतात. सर्व संघर्षांचे व दुःखांचे मूळ या कलीतच आहे.

त्याचप्रमाणे “मी देह” या भावामुळे जीवाच्या ठिकाणी मृत्यूचे भय निर्माण होते. कारण देह हे मृत्यूचे खाद्य आहे.

नामस्मरण “अमित-अगणित” होऊ लागल्यावर, साधकाच्या देहावर जरी मृत्यूची सावली पडली तरी सुद्धा हा शांत असतो. याचे कारण नामरूपाने राम जवळ असतो व साधकाला मृत्यूचा जरासुद्धा उपसर्ग होणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर सुद्धा नाम साधकाला सोडीत नाही. *एका जनार्दनी सर्व नाशिवंत।* *एकची शाश्वत हरिनाम।।*

अखंड व प्रेमाने केलेल्या नामस्मरणाने प्रभुचा प्रसाद होऊन साधकाला आपल्या “मूळ स्वरूपाचा” साक्षात्कार होतो.

निळा म्हणे स्वरूपसिद्धी।
नित्य समाधी हरिनामे।।
किंवा …
हे विश्वचि माझे घर।
ऐसी जयाची मती स्थिर।
किंबहुना चराचर। आपणचि जाहला।।”
किंवा ….
तुका म्हणे जे जे दिसे। ते ते वाटे मी ऐसे।।

मी देहाएवढा लहान नसून विश्वाएवढा व्यापक आहे. किंबहुना सर्व चराचर मीच झाली आहे, असा बोध झाल्यावर कली जागच्या जागी जिरतो, नाहीसा होतो व काळ म्हणजे मृत्यूचे भय नष्ट होते.

प्रामाणिकपणे, अट्टाहासाने व वेगाने नामस्मरण करता करता भगवन्नामाची गंगा हळूहळू विराट स्वरूप धारण करू लागते. भगवन्नामाचा सातत्याने उच्चार करीत गेल्यामुळे नामाच्या ज्या “दिव्य लहरी” (Divine Vibrations) उत्पन्न होतात, त्या दिव्य लहरी साधकाच्या स्थूल देहापासून ते महाकारण देहापर्यंतच्या सर्व चारी देहांना अक्षरशः घुसळून काढतात व त्यांना आपल्यासारखेच दिव्य करतात.

त्याचप्रमाणे विचार व विकार, संकल्प व विकल्प, आशा-निराशा, भीती व प्रीती वगैरे सर्व प्रकारच्या वृत्ती या भगवन्नामाच्या गंगेच्या विराट प्रवाहात वाहून जातात. ”मी देह आहे” हा आदिसंकल्प सुद्धा या भगवन्नामाच्या गंगेत विरतो व “साक्षात् भगवंतच ”मी” रूपाने प्रगट आहे” हा भाव अंत:करणात स्फुरू लागतो.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1049

error: Content is protected !!