नि:स्वार्थी कामगारनेते दुर्मीळ: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी:
“आजच्या काळात नि:स्वार्थी कामगारनेते दुर्मीळ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एखाद्या गुरूविषयी निष्ठा किती उच्च कोटीची असावी याचा वस्तुपाठ ‘रूपमय चटर्जी’ या चरित्रातून प्रत्ययास येतो!” असे गौरवोद्गार प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

कामगारशिक्षक अरुण गराडे लिखित आणि प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे निर्मित ‘श्रमयोगी कॉ. दादा रूपमय चटर्जी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. आमदार सुनील शेळके, आमदार नीलेश लंके, थिसेन क्रुप इंडस्ट्रीजचे राजेंद्र नागेशकर, टी.यु.सी.सी.चे राष्ट्रीय अध्यक्ष इंदूप्रकाश मेनन, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, ज्येष्ठ कविवर्य उद्धव कानडे, तुळसाबाई गराडे, प्रकाशक डॉ. दीपक चांदणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी राजेंद्र नागेशकर यांनी, “एका शिष्याने आपल्या गुरूला दिलेली गुरूदक्षिणा म्हणजे हे चरित्र होय. कंपनी व्यवस्थापनदेखील दादा चटर्जी या कामगारनेत्याचा आदर करीत असे; कारण रूपमय चटर्जी ही विचारांची संस्था होती!” असे विचार व्यक्त केले. इंदूप्रकाश मेनन यांनी कॉम्रेड दादा रूपमय चटर्जी यांचा जीवनपट मांडून “त्यांच्या १०३व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन होते आहे, हा आनंदाचा क्षण आहे!” अशी भावना व्यक्त केली.‌

काशिनाथ नखाते यांनी, “महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालची भूमी देशहितासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे!” असे मत व्यक्त केले. उद्धव कानडे यांनी, “अरुण गराडे यांनी केलेले लेखन कामगार क्षेत्रातील भावी पिढ्यांना लाभदायक ठरेल!” असा विश्वास व्यक्त केला.

लेखक अरुण गराडे यांनी, “नि:स्वार्थी कामगारनेते श्रमयोगी कॉम्रेड दादा रूपमय चटर्जी यांचे माझ्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे.‌ असा नेता पुन्हा होणे नाही!” अशी कृतज्ञता व्यक्त केली.‌ पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून अरुण गराडे यांच्या कामगार जीवनाची वाटचाल कथन केली. डॉ. दीपक चांदणे यांनी स्वागत केले. यावेळी कॉ. संभाजी शिंदे, कॉ. विष्णू कापसे, कॉ. अजय गडकरी, कॉ. श्रीमंत शितोळे, कॉ. मोहन घुले, कॉ. माणिकराव सस्ते, कॉ. राम वाइंगडे या कामगार नेत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

वृक्षाला पाणी घालून आणि कवी प्रभाकर वाघोले यांनी गायलेल्या श्रमिकगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुरेश कंक, दत्ता गराडे, जयवंत भोसले, भरत गराडे, वर्षा बालगोपाल, राजेंद्र वाघ यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली गराडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!