🙏”ज्ञानेशांचा संदेश”🌹
“सार्थ हरिपाठ”
अभंग १२ वा
ज्या प्रमाणे किरण हा “सूर्याचा भाव” आहे. त्याच प्रमाणे जीव हा “देवाचा भाव” आहे. या भावाची कळी उमलली की, “प्रभुचे चरणकमल” तेथेच साकार होतात. या भावाचे बळ वाढविणे हाच परमार्थाचा मार्ग होय. *भावबळे आकळे एरव्ही नाकळे।* *करतळी आवळे तैसा हरी।।*
एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, –
भावाचे मथिले निर्गुण संचले।
ते हे उभे केले विटेवरी।।
म्हणजे जसं नामाने मंथन होतं तसं भावाने मंथन होतं म्हणून नाम भावपूर्वक घ्या असं संत सांगतात. नाम आणि भाव एकत्र येऊन नाम घेतलं की, त्याच्या व्हायब्रेशन्स अधिक तीव्र असतात. ज्याप्रमाणे आपण ताकाचं मंथन करतो म्हणजे घुसळतो तसं आपण आपल्या शरीरामध्ये नामाच्या रवीने जाणीवेचं घुसळण केलं पाहिजे.
ही भावाची ठिणगी फुंकून फुंकून तिची ज्वाळा करणे हाच परमार्थ-सोपान आहे. संतसंगती व नामस्मरण यांच्या प्रभावानेच भावाच्या ठिणगीचे मोठ्या ज्वाळेत रूपांतर होते. भावाचे अंत:करणात असलेले “इवलेसे रोप” नामस्मरणाच्या सिंचनाने वाढीस लागते व त्याचा वेल गगनाला-आकाशाला-चिदाकाशाला जाऊन भिडतो. साधकाचा जीवभाव जातो,
अणू रेणू थोकडा। तुका आकाशा एवढा।।
व हा ब्रह्मभाव त्याच्या ठिकाणी स्फुरू लागतो. अशा रीतीने भावाच्या बळावर साधक “देवाला अगदी प्रत्यक्ष आकळतो”.
ज्याप्रमाणे करतळावर ठेवलेले आवळे प्रत्यक्ष समोर दिसतात, त्याचप्रमाणे
भावाच्या बळावर साधक देवाला साक्षात् पाहू शकतो. एरव्ही हा भाव नसेल तर देवाच्या प्राप्तीसाठी केलेली इतर सर्व साधने म्हणजे, जमिनीवर पडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याचे व्यर्थ प्रयत्न होत.
पारियाचा रवा घेता भूमीवरी।
यत्न परोपरी साधन तैसे।।
ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात सांगतात-
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण।
दिधले संपूर्ण माझे हाती।।
✅परब्रह्माचे निर्गुण स्वरूप हे आकळण्याच्या पलीकडे आहे. परंतु माझ्या सद्गुरूरायाने-श्रीनिवृत्तिनाथाने त्या परब्रह्म निर्गुण स्वरूपाला नामरूपाने “सगुण करून” ते मोठ्या कृपेने माझ्या स्वाधीन केले.
याचा भावार्थ असा की, श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेने ज्ञानदेवांना नामाचे वर्म समजले, नामाची गोडी लागली व त्या नामाचा अखंड जप करता करता अंत:करणात जी दिव्य ज्ञानज्योत उजळली. त्या ज्योतीच्या प्रकाशात ज्ञानदेवांना असे अनुभवाला आले की, भगवन्नाम हा नुसता शब्द किंवा ध्वनी नसून, साक्षात् “निर्गुण स्वरूप” परब्रह्मच नामरूपाने संपूर्ण सगुण आहे. *नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ।* *परब्रह्म केवळ रामनाम।।*
नाम हे असे परब्रह्मरूप आहे, म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात, — *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।* *पुण्याची गणना कोण करी।।* *-- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1044*
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे