वडगाव मावळ :
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय, आणि व्हीएसए सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस बारावीच्या अडीशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते आणि करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले, व्हीएसए अकॅडमीचे प्रा.विनोद चौधरी, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, विभागप्रमुख डॉ. नितीन धवस, डॉ. शेखर रहाणे, प्रा. मनीषा गोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.
“तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रांत मोठे योगदान देता येऊ शकेल. अभियांत्रिकी मधील करिअर मध्ये संशोधनापासून उद्योजकतेपर्यंत, उत्तम नोकरीपासून संरक्षण दलातील सेवेपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी सीईटी परीक्षेची तयारी उत्तम करा. दररोजचा दर्जेदार अभ्यास, स्वविकसनाच्या सवयी आणि मोठे ध्येय हे करिअरच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल,” असे प्रतिपादन प्रा. विजय नवले यांनी केले.
प्रा. विनोद चौधरी यांनी सी ई टी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी विद्यार्थ्यांना सूचित केल्या. सीईटीचा शेवटच्या टप्प्यातील अभ्यास कसा करावा याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. पुढील शिक्षणातील महत्वाची कागदपत्रे, शासनाच्या शुल्कमाफीच्या योजना, शिष्यवृत्ती या बाबत देखील मार्गदर्शन महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आले. या एकदिवशीय शिबिरात स्मरणशक्ती वाढीसाठीच्या गोष्टी समुपदेशक प्रा.मनिषा गोंधळे यांनी विद्यार्थ्यांना समजावुन सांगितल्या.
सकाळच्या सत्रात आगामी होणाऱ्या महा सीईटी -२०२३ च्या तयारीच्या दृष्टीने महाविद्यालयाच्या आणि अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन मॉक सीईटीचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक सीईटीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला. गुणवत्तेनुसार पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
कॉलेज व्यवस्थापनाशी बोलताना विद्यार्थ्यांनी सीईटीची असणारी भीती कमी झाल्याचे आणि चांगला सराव झाल्याचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्रा. शंकरराव ऊगले, प्रा. हर्षल चौधरी, प्रशांत सुतार, अविनाश पोटवडे यांनी मॉक सीईटी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,माजी मंत्री संजय बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के व कार्यकारी अधिकारी डॉ.गिरिश देसाई यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!