🙏”ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १२ वा”

अभंगाचा भावार्थ …..
✅अंतःकरणात भगवंताची दृढ निष्ठा-भाव नसतांना तीर्थक्षेत्राला जाणे, व्रतवैकल्ये करणे, नाना प्रकारचे नेमधर्म करणे, म्हणजे व्यर्थ कष्ट करणे होय. अशाने अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही.
✅करतळावर ठेवलेले आवळे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरिला आकळू शकतो, आपल्या अंत:करणात हरिला प्रत्यक्ष उभा करतो.
✅एरव्ही भावबळ नसतांना हरी आकळण्याचा, प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याची व्यर्थ धडपड करणेच होय.
✅ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथ यांच्या कृपेने साक्षात् निर्गुणस्वरूप परब्रह्मतत्त्व नामरूपाने संपूर्ण सगुण आहे, असा अनुभव मला प्राप्त झाला.

🌻थोडक्यात स्पष्टीकरण : … तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी। वांयाची उपाधी करिसी जना।।

निष्ठावंत भाव हे परमार्थाचे वर्म आहे. हा भाव नसेल तर तीर्थयात्रेला जाणे, व्रतवैकल्ये करणे व नाना प्रकारचे नेमधर्म करणे म्हणजे व्यर्थ शीण करणे होय. याच्या उलट जर ….
✅ एक भाव असेल तर इतर नाना प्रकारची साधने करून व्यर्थ त्रास करून घेण्याचेही कारण नाही. *एक भाव नाही तरी पाल्हाळ तें।।*

असे ज्ञानेश्वरीत म्हटले आहे.

➡️ भावाचे सामर्थ्य अद्भुत आहे. परमात्म्याचे एक टोक “भाव” तर दुसरे टोक “देव” आहे. कळी उमलली की तेच कमळ, त्याप्रमाणे ….
*”भाव उमलला” की तोच “देव” आहे. म्हणूनच संत सांगतात *”भाव तोचि देव”.*
तात्पर्य,
👏भावाची जोपासना हीच देवाची उपासना आहे. परंतु भाव कशाला म्हणतात हे नीट समजून घेतले पाहिजे; कारण ”भाव” हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो.

✅भाव याचा अर्थ “संबंध”! आपण व देव यांचा संबंध जेव्हा लक्षात घेतो तेव्हा देवाबद्दल प्रेम निर्माण होईल किंवा द्वेष निर्माण होईल. परंतु गंमत अशी की, देवाचाच पत्ता नाही, परिणाम देवाबद्दल ना प्रेम ना द्वेष अशी आपली अवस्था आहे.
*➡️ मग देवाशी संबंध आपण कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न करतो. देव कुठेतरी आहे. देव आकाशात आहे अशी कल्पना करतो.

या ठिकाणी भाव या शब्दाचा अर्थ काय ते पहाण्याचा प्रयत्न करू.
”मी” देवाचे रूप आहे व देव ‘मी’ चे स्वरूप आहे, हा जो मी व देव यांचा संबंध त्या संबंधाला भाव असे म्हणतात. वास्तविक …..
‘➡️”मी” हा देवाचा भाव आहे. ”मी” रूपाने देवच देहात प्रगट आहे.

✅ हा “मी”* म्हणजे चैतन्यशक्ती आहे असा भाव जेव्हां निर्माण होतो तेव्हां “जीवभाव जातो व “शिवभाव” निर्माण होतो हा अभ्यास आहे!

याच अर्थाने ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
अर्जुनपण न घेतां। मी ऐसे पांडुसुता।।
उठतसें तत्त्वता। ते तयाचे रूप।।

ज्या प्रमाणे किरण हा सूर्याचा भाव आहे. त्याच प्रमाणे जीव हा देवाचा भाव आहे. या भावाची कळी उमलली की, “प्रभुचे चरणकमल” तेथेच साकार होतात. या भावाचे बळ वाढविणे हाच परमार्थाचा मार्ग होय.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
*✍️ स. प्र. (sp)1043

error: Content is protected !!