“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग ११ वा”

अभंगाचा भावार्थ …..
ज्याप्रमाणे गवताच्या गंजीला अग्नीचा स्पर्श झाला तर ते सर्व गवत अग्नीमध्ये जळून खाक होते, त्याप्रमाणे पापांच्या राशीला जर हरिनामाचा स्पर्श झाला तर सर्व पापे नामात जळून भस्म होतात.

हरिनाम हा महामंत्र आहे व त्याची शक्ती अगाध आहे. नामाच्या उच्चाराने जीवाची भूतबाधा नाहीशी होते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, हरी व त्याचे नाम ही अलौकिक आहेत. अशा हरिच्या स्वरूपाचा व त्याच्या नामाच्या सामर्थ्याचा थांग उपनिषदांना सुद्धा लागत नाही.

🪔 थोडक्यात स्पष्टीकरण — ..
पिंपळाचा अजस्त्र वृक्ष हा पिंपळाच्या झाडाच्या “बी”तून निर्माण होतो, त्याप्रमाणे अनंत पाप राशी या “विकारांतून” आकाराला येतात.

या विकारांचे प्रकार सहा : काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर. हे विकार जळून खाक झाल्यावाचून माणसाच्या जीवनात निर्माण होणारी पापांची टांकसाळ बंद पडणार नाही. विकार निर्माण होतात “वासनेमुळे” व “देवाचा विसर” हे या वासनेचे “बीज” आहे.

✅ बहुसंख्य लोकांना “देवाचा विसर” म्हणजे काय व “देवाचा आठव” म्हणजे काय हेच माहित नसते. देवाचा विसर म्हणजे स्वस्वरूपाचा विसर व स्वस्वरूपाचा विसर म्हणजे “आपण आपल्याला आपल्यातच हरवून बसणे” हे होय. यालाच “भ्रम” हे दुसरे नांव आहे.

“देवाचा आठव” हे खऱ्या अर्थाने खरे अमृत होय. हे अमृत ज्याला प्यावयास मिळाले तो भाग्यवान माणूस एका बाजूने “अमर” होतो व दुसऱ्या बाजूने त्याचे जीवन “सर्वांगाने गोड” होते.

“देवाचा आठव” ही गोष्ट अतीव महत्त्वाची आहे . परंतु खरे सद्गुरू भेटल्याशिवाय “देवाचा आठव” ही जीवनाची “गुरूकिल्ली” साधकाच्या हातात येत नाही.

तात्पर्य, देवाचा विसर म्हणजे “स्वरूपाची विस्मृती” हीच सर्व पापांच्या व दुःखांच्या निर्मितीला कारण आहे. अखंड नामस्मरणाने ”मी देवाचा व देव माझा आहे” हा बोध साधकाच्या ज्ञानात स्फुरू लागतो.

किरण सूर्यापासून कुठल्याही अवस्थेत कधीच वेगळा नसतो. उलट सूर्यानेच किरणाला अखंड धरून ठेवलेले असते. त्याप्रमाणे “मी” देवापासून वेगळा नसून, देवाची भक्ती न करताना सुद्धा देवाचा सहजच भक्त आहे.

किंबहुना देवानेच ”मी” ला अखंड धरून ठेवलेले आहे व म्हणून ”देव माझा भक्त आहे व मी देवाचा भक्त आहे”. ही स्मृती नामस्मरणाने नामधारकाचे ठिकाणी जागृत होते व या स्मृतीत सर्व पापांच्या राशी विकारांसह व सर्व विकार वासनेसकट जळून खाक होतात.

म्हणूनच तुकाराम महाराज नामाला “अग्नीची ज्वाळा” असे संबोधतात.

चाल केलासी मोकळा।
बोल विठ्ठल वेळोवेळां।।
तुज पापचि नाहीं ऐसे।
नाम घेता जवळी वसे।।
पंच पातकांच्या कोडी।
नामे जळतां नलगे घडी।।
तुका म्हणे काळा।
रीघ नाहीं निघती ज्वाळा।।

गवताची गंजी केवढीही मोठी असली तरी अग्नीच्या स्पर्शाबरोबर ती जळून खाक होते, त्याप्रमाणे नामाच्या उच्चारात स्वस्वरूपाची जी स्मृती प्राप्त होते तीत सर्व पापांच्या राशी जळून जातात. *तृण अग्नि मेळे समरस झाले।* *तैसे नामे केले जपतां हरि।।*

(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स.प्र.(sp)1041

error: Content is protected !!