🙏”ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग ९ वा”

ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, …..
ज्या नामाने भगवत्’प्रेम प्राप्त होते ते नाम ही अद्वैताची वाट आहे.

तुकाराम महाराज सांगतात-
स्वल्प वाटे चला जाऊं। प्रेमे गाऊ विठ्ठल।।
तुका म्हणे हेचि नीट। जवळी वाट वैकुंठा।।

नामगायन ही अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी, वैकुंठाला नेणारी जवळची व सुखाची वाट आहे.
नामदेव महाराज सुद्धा म्हणतात —
नामेचि तरले नामेचि तरले।
नाम म्हणता गेले वैकुंठासी।।

“ज्या ठिकाणी वृत्ती कुंठित होते त्या ठिकाणाला वैकुंठ म्हणतात”. ते ठिकाण म्हणजे जेथे द्वैताचे भान नाही, असे आपले अद्वैत स्वस्वरूप. जन्माला येऊन ज्याने नामाची वाट अनुसरली नाही, संतांकडून जाणून घेतली नाही, तो खरोखरीच दुर्दैवी होय! *उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा।* *रामकृष्णी पैठा कैसा होय।।*

अशांना भगवंताचे चरण कसे प्राप्त होतील असे ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कळकळीने विचारतात. गुरूकृपेने ज्यांना ज्ञान मिळते त्यांनाच भगवत्प्राप्तीचा लाभ होतो. गुरूबोधाने, साधुबोधाने, संतबोधाने जे ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाच्या प्रभावाने द्वैत आपोआप मावळू लागते व अद्वैत स्वरूप दृष्टीत भरू लागते.

“मी” हे देवाचे रूप आहे, देह हा देवाचा आकार आहे व विश्व हा देवाचा विलास आहे, असे ज्ञान साधकाच्या ज्ञानात जसजसे स्फुरू लागते, तसतसे भगवंताचे प्रेम अंत:करणात संचरू लागते. या प्रेमाचा भोग भक्त भगवंताला त्याच्याच नामाने आळवून, गाऊन, संकीर्तन करून घेऊ लागतो. *द्वैताची झाडणी गुरूविण ज्ञान।* *तया कैचे कीर्तन घडे नामी।।*

असे नामसंकीर्तन गुरूकृपेने, गुरूबोधाने, द्वैताची झाडणी झाल्यावाचून कसे होईल?

शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
नाम हे देवाचे सगुण ध्यान आहे व नामपाठाने प्रपंचाचे मौन होते. *ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान।* *नामपाठे मौन प्रपंचाचे।।*

”ध्यान” या शब्दाचा अर्थ आपण एरव्ही जसा करतो तसा तो येथे नाही. मन एकाग्र करून मूर्तीचे रूप डोळ्यापुढे आणणे म्हणजे ”ध्यान”, ज्याला इंग्लिशमध्ये आपण Meditation म्हणतो ते ध्यान या ठिकाणी अभिप्रेत नाही.

ते ध्यान तुकाराम महाराज सांगतात त्या प्रकारचे आहे.
तुका म्हणे केली नेत्री ओळखण।
तटस्थ ते ध्यान विटेवरी।।

नाम हे देवाचे सगुण ध्यान आहे. नाम हेच देवाचे रूप आहे. नामाच्या रूपाने देव सगुण-साकार आहे. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात-
नाम तेचि रूप, रूप तेचि नाम।
नामरूपा भिन्न नाही नाही।।
आकारला देव नामरूपा आला।
म्हणोनी स्थापिला नामवेदी।।
अशा दिव्य नामाच्या पाठाने, घोषाने प्रपंचाचे मौन होते. स्वरूपाच्या विसरात प्रपंचाचे भान होते, तर स्वरूपाच्या स्मृतीत प्रपंच विरून जातो. नामाने स्वरूपाची स्मृती जागृत होते व सर्वत्र चैतन्याची प्रतीती येते.

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात —
“न आहे प्रपंच झाला परब्रह्म।
अहं सोहं ब्रह्म आकळले।।”
नामाने प्रपंचाचे मौन होते म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात- *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।* *पुण्याची गणना कोण करी।।* *-- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1038*

error: Content is protected !!