“ज्ञानेशांचा संदेश”घ
“सार्थ हरिपाठ”
“अभंग ७ वा”
पर्वताप्रमाणे पातक करणे। वज्रलेप होणे अभक्तासी।। नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त। हरिसी न भजत दैवहत।
अनंत वाचाळ बरळती बरळ।
त्या कैचा दयाळ पावे हरी।।
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान। सर्वांघटी पूर्ण एक नांदे।।
अभंगाचा भावार्थ : …..
स्वरूपाची विस्मृती होणे, देवाचा विसर पडणे, म्हणजेच पर्वताएवढे पातक करणे होय! अभक्तांना हे पातक वज्रलेप होते. ज्यांना हरिची भक्ती नाही, जे हरिला भजत नाहीत, ते खरोखरीच पतित व दैवहत होत.
वाचेने हरिनाम घेण्याऐवजी जे विनाकारण वाचाळता करतात व मनाला येईल ते बरळतात, त्यांना हरी दयाळू असला तरी कसा पावेल ?
ज्ञानेश्वर महाराज सांगतात , ….. आत्मा हाच जीवाचे खरे निधान असून तोच एक सर्वत्र भरून राहिला आहे, हे संतवचन, हा त्यांचा सिध्दांत प्रमाण मानून तू ईश्वराची भक्ती म्हणजे नामस्मरण कर.
थोडक्यात स्पष्टीकरण :
पर्वताप्रमाणे पातक करणे।
वज्रलेप होणे अभक्तासी।।
संतांचे असे सांगणे आहे की —
देह मी म्हणता। घडे कोटी ब्रम्हहत्या।।
“मी” तत्वतः व वस्तुतः आत्मा-परमात्मा असता, आकाशाला पोटात ठेवणारे चिदाकाश हे माझे स्वरूप असता, “मी” स्वतःला संकोच करून स्वतःला देहाइतकेच मानणे, “मी देह आहे”, असे म्हणणे म्हणजे फार मोठे पातक करणे होय!
हे पापच आपल्या प्रपंचाचे मूळ आहे व म्हणूनच प्रपंच हा दुःखरूप झाला आहे.
तुकाराम महाराज म्हणतात –
अणुरेणू थोकडा। तुका आकाशाएवढा।।
त्याचप्रमाणे ते जीवाला उपदेश करतात —
संकोचोनि कासया झालासि लहान।
घेई आपोषण ब्रम्हांडाचे।।
वास्तविक , …..
जीवाचे स्वरूप एवढे ऐश्वर्ययुक्त असताना त्याने देहाशी तादात्म करुन घेऊन स्वतःला देह समजणे हेच जीवाचे मोठे पाप आहे व त्याच्या जीवनात ताप निर्माण करण्यास तेच कारणीभूत आहे.
या पापाचा नाश करण्याचे सामर्थ्य फक्त “ईश्वरभक्तीत” आहे. “देवाचे मनोभावाने स्मरण करणे, प्रेमाने त्याचा आठव करणे व आवडीने त्याच्या नामाचे संकीर्तन करणे याचे नांव भक्ती”.
या भक्तीनेच भगवतकृपा होऊन साधकाची देहबुध्दीच्या महापातकापासून मुक्तता होते. याच्या उलट जे या भक्तीच्या मार्गाला जात नाहीत अशा अभक्तांना तेच पातक वज्रलेप होते. त्या पातकाचे बंधन ढिले होण्या ऐवजी ते जास्त दृढ होऊ लागते व त्याची पूर्ण अधोगती होते .
हरिची भक्ती न करणारे व त्याच्या भजनाला विन्मुख असणारे हे अभक्त खरोखरीच पतित व दैवहत होत. *नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त।* *हरिसी न भजत देवहत।।*
अशी अभक्त मंडळी पुष्कळ वाचाळता करतात व मनाला येईल ते बरळतात पण देवाचे नाम मात्र चुकून सुद्धा वाचेने घेत नाहीत.
उलट नामस्मरण व ईश्वरभक्ती करणाऱ्यांची ही मंडळी वाटेल तशी कुटाळकी व हवी तेवढी निंदा करतात. अशा या अभक्तांना देव दयाळू असून सुध्दां पावत नाही. *अनंत वाचाळ बरळती बरळ।* *त्या कैचा दयाळ पावे हरी।।*
“भाव तसा देव” हा देवाच्या दरबारातील न्याय आहे. अभक्तांना देवाचे आस्तित्वच मान्य नसल्यामुळे त्यांना तो पावण्याचा प्रश्नच उदभवत नाही. देव दयाळू आहे भक्तांना! कारण त्यांचा तसा भाव असतो. म्हणून,
ज्ञानेश्वर महाराज सांगतात , …
तुला जर ”खरा” भक्त व्हायचे असेल व तुझ्यावर भगवंताची कृपा व्हावी असे वाटत असेल, तर आत्मा-परमात्मा हाच जीवाचे खरे ”निधान” आहे, जीवाचे “जीवन” आहे व तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे, हा संतांचा सिध्दांत, अनुभव प्रमाण मानून त्याची भक्ती म्हणजे उपासना कर. *ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान।* *सर्वांघटी पूर्ण एक नांदे।।*
ही उपासना करण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण, म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांंना कळकळीने उपदेश करतात, — *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।* *पुण्याची गणना कोण करी।।* *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र.(sp)1034*
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस