परिणीती एका अंधश्रद्धेची– मला न उमगणाऱ्या एका बाईची— उन्हाच्या वेळी भरदुपारी माझ्या रुग्ण तपासण्याच्या टेबलावर एक थकलेला ग्रामीण जीव- अंगात भरपूर ताप!—
पेशंट तापाच्या ग्लानीत!
हातापायावर ,पोटावर, कुल्यावर भाजल्याच्या खुणा! उजव्या पायावर सूज- पायाच्या घोट्याजवळ झालेल गळू- त्यातून पू बाहेर येतोय!
पेशंटची ती अवस्था पाहून मी सुन्न झालो!
एकंदरीत हालत काही ठीक नव्हती!
पेशंटला काही विचारूही शकत नव्हतो! कारण पेशंट तापाच्या ग्लानीत होता!
मी पेशंटला ऍडमिट करून घेतलं! सिस्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या!
औषधांची उपाययोजना केली!
कन्सल्टिंगरूममध्ये आलो,माझ्या खुर्चीत बसलो! समोर ज्यांन पेशंटला एडमिट केलं होत तो बसला होता!
साधारण काटकुळा देह, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वयोमान दर्शवित होत्या!
डोईवर पांगोट होतं–
अंगात मळकट धोतर आणि सदरा!
पाटील हा पेशंट तुमचा कोण?
प्वार नव्हं माझं ?
त्यांच प्रश्नमिश्रित उत्तर!
नाव काय?
कुणाचं ?
पेशंटच?
सोपाना…
संबंध नाव सांगा ?
सोपान महादू काटे….,
गाव कुठलं ?
वराळं..,
मी केसपेपर वर नोंदी केल्या! पेन खाली ठेवला आणि त्या गृहस्थाकडे पहात संभाषणाला सुरुवात केली-
हे पहा मी पेशंटला ऍडमिट केलंय!.इथं त्याला आणायला तुम्ही बराच उशीर केला आहे!
..डॉक्टर साहेब काय सांगू तुम्हाला– चार-पाच येळा येऊन गेलो …
पण तुम्ही कुठे बाहेरगावी गेलता …
मग दुसर्या डॉक्टरकडं नेलं! त्येनं लाल रंगाच आवशिद दिलं!
ताप कमी होईल म्हणालं! पण ताप काही हटना …
मग दुसऱ्या डॉक्टरांकडं नेलं त्यांन तर आम्हाला हाकूनच दिलं दवाखान्या बाहेर!….
म्हणाला आदुगर
ज्याच्याकडे गेलता त्याच्याकडेच जावा! …
असं दोन तीन येळा झालं….
म्हातारबुवांच्या शब्दांचा एक्सीलेटर पिळला जातो हे माझ्या लक्षात आलं! ..
तेव्हा त्यांना मध्येच थांबवत मी विचारलं …
बाबा– सोपानाच्या पोटावर, पायावर, हातावर भाजल्यासारख्या खुणा आहेत! .कुठे निखारे वगैरे पडले की काय त्याच्या अंगावर?
नाही नाही …तसं काहीही नाही! देवानं हात फिरविला नव्हं का त्याच्यावर ?
देवानं …..मी चकित!
साऱ्या पृथ्वी तळावर देवाला सोपानाच्या अंगावर हात फिरवावा अस वाटल- त्याचा अर्थ सोपानासारखा पुण्यवान प्राणी जगात दुसरा कुठलाही नसावा- असं मला उगीचच वाटलं! …..
हा, देवानं! .
त्याचं काय झालं डॉक्टर साहेब–सोपानाच्या पायाला
‘ बाई ‘ झाली होती ना!
बाई ….?
सोपनाच्या पायाला बाई झाली म्हणजे नक्की काय झालं? हे काही माझ्या ध्यानात येईना?.
माणसाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली ,कुत्रीला पिल्ल झाली या वाक्यांचा अर्थ कळतो!
तरी पण पायाला बाई झाली हे म्हणजे खूपच झालं!..
हा- बाई नव्ह का?–
पहिल्यांदा लहान होती! मग मोठी मोठी होत गेली! .
बाई झाल्यामुळं तर पाय वाढला ना! माझ्या अज्ञानाची म्हातारबुवांना कीव आली!
माझ्या थोडसं लक्षात आलं_- पायाला जे गळू झालं होतं , त्याला बाई म्हणत असावेत हे गृहस्थ !
हा आलं लक्षात !
मी मान हलवली.
तर बाई झाली! आम्ही सगळे घाबरलो म्हटलं हे काय आक्रीत म्हणून त्याला नेलं भक्ताकडं! मांड भरायला….,
मांड …?
हा म्हणजे भगत चौरंगावर देवी मांडतो ,पुजा करतो ,उतारा करतो रातभर भजन करतो ,ताशा वाजवतो! …,
मग काय होतं ?
मला आता अंधश्रद्धेची गंमत वाटायला लागली! .
मग जर देव प्रसन्न झाला तर बाई ओकते.
बाई ओकते …,
हा अक्षी वाकारीवानी फळा फळा वोकते !,
माझ्या मनात प्रश्न: पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?
बाई ओकते …
मला कळलेलं उत्तर– बाई ओकते ,म्हणजे गळू फुटणे!फोडाचा निचरा होणे ,पू बाहेर येणे!
जमलं गड्या डॉक्टर! मनातल्या मनात मी स्वतःला शाबासकी दिली.
अर्थ कळला म्हणून!…
मग बाई ओकली का ….?
माझं कुतूहल जागं झालं…
नाही ,…..बाई काय अशी तशी नव्हती!
भगताला काय दाद देईना!
म्हणून नेल मोठ्या भक्ताकडं!
मोठ्या भक्ताकडे …..?
हा मग मोठा भक्त म्हणजे लय पावरबाज! लहान भक्ताला बाई दाद देईना म्हणून गावकरी म्हटलं ह्याला लागीर झालं असणार!…. आता लागीर म्हणलं तर ते
उत्तरवया मोठा भक्तच पाहिजे ना…
मी मान डोलावली! मान डोलवण्या पलीकडे
मी तरी काय करणार होतो म्हणा!
पुढं काय झालं …?
मोठ्या भक्तानं पायलं अन् लगेच ओळखलं की हे लागीर लय भारी हाय!…. मग त्याने पूजाबिजा केली आणि हातात घेतला झाडू, झोड , झोड …झोडपलं …
कोणाला?
सोपानाला …
हा म्हणजे सोपानाला झोडलं…. असं दिसतं पण– प्रत्यक्षात मार बसतो आतल्या लागीराला! …..तर लई झोडपलं तरी लागीर काही बोलनां …
मग तापविला चिमटा अन् दिले डाग — पोटावर ,हातावर तवा लागीर बोललं– मला माफ करा, मी हे झाड सोडून जातूय…,
मग लगेच बाई फळाफळा वोकली ….
पुरणपोळीचं जेवण केलं.
माझ्या लक्षात साऱ्या घटना आल्या!
अंधश्रद्धेने झपाटलेली ही ग्रामीण माणसं काय करतील याचा भरोसा नाही!
एखाद्या वेळी जीव जायचा अशाने!
सोपानाच्या अंगावर जे भाजल्यासारखं होतं त्याचा उलगडा आत्ता मला झाला!
पायाच्या गळू मूळ_ पाय सुजला, त्यात माझ्या निदाना प्रमाणे तो टायफाईड होता!
नशीब निदान या लोकांनी यावेळी तरी त्याला माझ्याकडे आणलं! उशीर झाला असता तर अंधश्रद्धेन एक भाबडाजीव स्वर्गवासी झाला असता!
मला चीडच आली–
आवाजात कडवटपणा, उपरोध आणत मी
खवचटपणाने म्हातारबुवांना विचारलं …
बाबा भक्तांना बाईला जसं ओकायला लावलं तसा ताप का नाही उतरवला ….? हे ऐकल्यावर मतारबुवांन असा आवाज काढला की बस्स…! भक्ताचं काम बाईला ओकायला लावण्याचं… लागीर काढायचं ….ताप बिप अशी बारकी काम भगत कधीच करीत नसतो! …..ते काम डॉक्टरचं!…, म्हणून तर सोपान्याला इथं आणलय…. का ?
सोपानाच्या बाईने माझ्यातल्या डॉक्टरला चारीमुंड्या चीत केलं……
मित्रांनो प्रश्न इथे सुटला नाही! मी सोपनाच्या रक्ताच्या विविध तपासण्या केल्या! त्यामुळे माझ्या अनुमाना प्रमाणे याला टायफाईड म्हणजेच विषमज्वराचा ताप निघाला! त्यामुळे योग्य उपचार सुरू झाला आणि सोपान ठणठणीत बरा होऊन घरी गेला!
मित्रांनो- या सर्व घटनेकडे मागे वळून बघताना असं वाटतं की- कितीतरी निष्पाप जीव या ग्रामीण भागातील अंधश्रद्धेच्या रुढी परंपरेला बळी पडत असतील!
विज्ञान युक्त शिक्षण आणि संस्कार यांच्या माध्यमातून परमेश्वर या अंधश्रद्धेच्या विळख्यातून त्यांची सुटका करो हीच प्रार्थना .
( शब्दांकन- डॉ.शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस