वडगाव मावळ:
पोटोबाचा चांगभले… च्या जयघोष करत गुरुवारी मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांच्या उत्सवास सुरुवात झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिषेक, छबिना, मानाचे बगाड, मानाच्या काठ्या, भजन स्पर्धा आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले.
देवस्थानचे सर्व विश्वस्त व उत्सव कमिटीचे पदाधिकारी यांच्या हस्ते श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी मातेचा अभिषेकाने उत्सवाची सुरुवात झाली. यानंतर महापूजा, महाआरती व श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. दुपारी मानकरी गणेश गोविंदराव ढोरे यांच्या हस्ते मिरवणूक व पूजा करून मानाचे बगाड सुरू करण्यात आले. या वेळी अनेक भाविकांनी नवस फेडण्यासाठी व बगाड पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच, मावळ तालुक्यातील येळसे, घोणशेत व शेटेवाडी येथून आलेल्या मानाच्या काठ्यांचे उत्साहात आगमन झाले.
भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती, दरम्यान सायंकाळनंतर मात्र दर्शनासाठी व उत्सवाचा आनंद घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. उत्सवानिमित्ताने विविध प्रकारची दुकाने, लहान मुलांची खेळण्याची साहित्य यामुळे उत्सवाला चांगलीच रंगत आली होती. रात्री परंपरेप्रमाणे शोभेचे दारुकाम व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी श्री पोटोबा महाराज मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली तर नगरसेवक प्रवीण चव्हाण व माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी पालखी मार्गावर स्वागत कमान उभारली आहे. पुजारी शरद गुरव, समीर गुरव यांनी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे. तसेच मावळ फेस्टिव्हलच्या वतीने उत्सवातील सर्व विक्रेत्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
पेशवेकालीन सोन्याचे मुखवटे
सकाळी भजनी पथकासह सर्व देवतांच्या मंदिरांना भेटी देऊन चावडी चौकातील गुरव वाड्यापासून मंदिरापर्यंत छबिना काढण्यात आला. या वेळी छबिना मार्गावर फुले अंथरून चौघडा वादनासह मोठ्या उत्साहात ‘श्रीं’चे आगमन झाले. त्यानंतर ‘श्रीं’ची पुनर्स्थापना करून पेशवेकालीन सोन्याचे मुखवटे परिधान करण्यात आले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस