🙏”ज्ञानेशांचा संदेश”👏8
“सार्थ हरिपाठ”
अभंग ५ वा

योग, याग, विधी या साधनांचा सिद्धीसाठी अवलंब करणाऱ्या साधकांच्या हातून जर कांही ”कमी जास्त” प्रकार झाला तर हित होण्याऐवजी “अनहित” होण्याचाच संभव फार!

त्याचप्रमाणे या मार्गाचा अवलंब करणाऱ्या साधकांची लोकांमध्ये ते मोठे योगी, याज्ञिक किंवा वैदिक म्हणून वाया प्रसिद्धी होते व या प्रसिद्धीचा परिणाम दंभधर्मात होऊन साधक शेवटी अधोगतीला जातात. म्हणून असल्या साधनांकडे संसारी जनांनी चुकून सुध्दां वळू नये.

यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी कठोर शब्दांत त्यांचा या अभंगात निषेध केलेला आहे.
ही अध्यात्मसिध्दी जर योग, याग व विधीने प्राप्त होणार नाही तर मग कशाने होईल ? हा प्रश्न सहजच निर्माण होतो, याचे उत्तर ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत देऊन मोठ्या गोड शब्दांत दिले आहे, —
भावेविण देव न कळे निःसंदेह।
गुरूविण अनुभव कैसा कळे।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त।
गुजेविण हित कोण सांगे।।

भावाशिवाय देव न कळे म्हणजे नाकळे, आकळता येत नाही व गुरूकृपेशिवाय आत्मानुभव कुणाला प्राप्त झाला आहे ?

तप केल्याशिवाय दैवत प्रसन्न होत नाही, त्याचप्रमाणे देण्याची क्रिया घडल्यावाचून घेण्याची क्रिया होऊच शकत नाही. “जो देतो त्यालाच मोबदल्यात मिळते”.

ज्याला आपले अंतःकरण मोकळे करता येत नाही त्याला त्याच्या हिताची गोष्ट कोण सांगू शकेल ?

या दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट घडल्याशिवाय दुसरी गोष्ट घडतच नाही, संभवतच नाही, त्याचप्रमाणे साधुंची-संतांची संगती जर लाभली नाही तर साधकाला तरणोपायच नाही. त्याला अध्यात्मसिद्धी प्राप्त होणार नाही, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

अध्यात्माचे वर्म समजल्याशिवाय केलेले भजन-पूजन म्हणजे नुसती कवाईत आहे. अशा साधकांची परमार्थात प्रगती होणे कठीणच. घाण्याला जुंपलेला बैल कितीही चालला तरी तो त्याच्या आखलेल्या रिंगणाच्या पलीकडे एकही पाऊल जाईल तर शपथ.

त्याचप्रमाणे अध्यात्माचे वर्म न समजता केलेले भजन-पूजन साधकाला अहंकाराच्या देहबुद्धीच्या रिंगणाच्या पलीकडे एकही पाऊल नेऊ शकत नाही.

परमेश्वर प्राप्तीसाठी करीत असलेल्या साधनाला जे श्रवण पोषक होते ते “शुद्ध श्रवण” व ज्याच्या शुद्ध श्रवणाने साधकाची परमार्थ-पथावर प्रगती होत राहते “तो सद्गुरू”.

परमार्थ हा दिसावयास फार सोपा परंतु आचरण्यास फार कठीण असा मार्ग आहे. या मार्गावर साक्षात् श्री शंकर सुद्धां अजून पांथिक आहेत असे ज्ञानेश्वर माऊलींनी एके ठिकाणी सांगितलेले आहे.
तेथ प्रवृत्तितरूच्या बुडीं।
दिसती निवृत्तीफळाचिया कोडी।
जिये मार्गीचा कापडी। महेशु आझुनी।। *ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात।* *साधूचे संगती तरणोपाय।।*

याचे कारण असे की, ज्या हरिनामाने साधकाला प्रत्यक्ष हरिची प्राप्ती होते आणि त्याचे आत्यंतिक कल्याण होते, ते हरिनाम संतसंगती शिवाय मिळत नाही आणि मिळाले तरी टिकत नाही.

म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात “साधूचे संगती तरणोपाय” असे निक्षून सांगतात व उपदेश करतात, –
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी। *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️स. प्र. (sp)1032*

error: Content is protected !!