🙏”ज्ञानेशांचा संदेश”👏
“हरिपाठ”
अभंग ५ वा
योगयागविधी येणे नोहे सिध्दी।
वायाची उपाधि दंभधर्म।।
भावेविण देव न कळे निःसंदेह।
गुरूविण अनुभव कैसा कळे।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त।
गुजेविण हित कोण सांगे।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात।
साधूचे संगति तरणोपाय।।
अभंगाचा भावार्थ :
योग, याग, विधी या साधनांनी अध्यात्मसिध्दी प्राप्त होत नाही. उलट विनाकारण उपाधी आणि दंभ मात्र पदरी पडतात. भावा शिवाय देव आकळत नाही, हे निःसंशय, त्याचप्रमाणे गुरूकृपे शिवाय अनुभव कसा प्राप्त होईल ?
तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही, त्याचप्रमाणे आपले गुह्य किंवा निजगूज दुसऱ्याला सांगितल्या शिवाय त्याला आपल्या हिताचा मार्ग कसा सांगता येईल ?
ज्ञानदेव महाराज सांगतात की, वर दिलेल्या दृष्टांतात ज्याप्रमाणे एकाशिवाय दुसरे संभवत नाही, त्याप्रमाणे साधुच्या संगती शिवाय साधकाला तरणोपाय नाही .
थोडक्यात स्पष्टीकरण : *योग याग विधी येणे नोहे सिद्धी।* *वायाची उपाधि दंभधर्भ।।*
पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी, योग, याग व विधी या साधनांचा कडक शब्दात निषेध केला आहे, याचे कारण ही साधने खोटी आहेत असे नाही.
ज्ञानेश्वर महाराज स्वतः योगी होते, नव्हे ते “योगिराज” होते. योग हे काय प्रकरण आहे याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव होता आणि म्हणूनच संसारी माणसांना हरिनामाचा उपदेश करीत असतांना त्यांनी योगाचा कडक शब्दांत निषेध केला.
हरिपाठातून ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला हरिनामाचा उपदेश हा प्रमुखतः संसारी लोकांसाठी आहे. पहिल्याच अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी “असोनि संसारी जिव्हे वेगु करी” या शब्दांत ही गोष्ट स्पष्ट केली आहे .
संसारी माणसांना आपला प्रपंच सांभाळून देवाच्या प्राप्तीसाठी, अध्यात्मसिद्धिसाठी करण्यासारखे एकच साधन आहे व ते म्हणजे “हरिनाम”. बाकीची साधने एरव्ही कितीही जरी खरी असली, तरी संसारी जनांना त्यांचा काहीच उपयोग नाही. कारण योग, याग आणि विधी या साधनांच्या सिद्धिसाठी जे नियम पाळावे लागतात व ज्या गोष्टी उपलब्ध असाव्या लागतात, ते नियम संसारीजनांना पाळता येणे सर्वसाधारणतः अशक्य असते व जरूर त्या गोष्टीही उपलब्ध होऊ शकत नाही.
ज्याप्रमाणे कुंपणानेच शेत खावयास लागावे त्याप्रमाणे परमार्थात लादलेले नियम व बंधने साधकाचा परमार्थच बिघडवू लागतात. या विविध बंधनांमुळे व त्यांच्या कष्टपूर्वक परिपालनामुळे साधकाचा देहभाव कमी होण्याऐवजी अधिकच दृढ होऊ लागतो. बंधनांचे परिपालन जितके अधिक तितकी साधकाची अहंकाराची सूज अधिकच वाढू लागते आणि तो अत्यंत कर्मठ बनू लागतो.
परंतु संतांच्या नामसाधनेत नियम-बंधनांचा कर्मठपणा नाही. येथे एकच पथ्य आहे व ते म्हणजे ”नाम सतत घेत राहणे” हेच होय.
तुकाराम महाराज तेच सांगतात, —
पथ्य नाम विठोबाचें। आणिक वाचे न सेवी।।
शिवाय ही साधने अशी विचित्र आहेत की, त्यांचा अवलंब करणाऱ्या साधकांच्या हातून जर कांही ”कमी जास्त” प्रकार झाला तर हित होण्याऐवजी अनहित होण्याचाच संभव फार, म्हणून संत मंडळी आपणांला बजावून सांगतात की, *योग याग धरू नका। कष्ट उरतील जे कां।।* *कर्मधर्म नव्हती सांग। उण्या अंगे पतन।।*
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र(sp)1031
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस