देवभावात “मी कर्ता” हा भाव जाऊन “देव कर्ता” असा भाव निर्माण होतो. “मी पाहातो, मी बोलतो, मी करतो” ही भाषा जाते व त्याऐवजी
“देव पाहतो, देव बोलतो, देव करतो” अशी भाषा सुरू होते. हा भाव अत्यंत श्रेष्ठ आहे. या भावाच्या उपासनेने साधक अहंकाराचा संपूर्ण नाश करून व ओंकाराच्या माथ्यावर पाय देऊन भगवंताशी एकरूप होतो.
“परेहूनी परते घर, तेथे राहू निरंतर”
परेच्या पलीकडे आम्ही रहातो आणि तिथून आम्ही सर्व व्यवहार करतो.
त्या चैतन्याची चित् सत्ता।
सर्वकाळ आठवे चित्ता।
तरीच बोलीजे अनन्यता।
येरव्ही सर्व विफळ।।
ती सत्ता, ते चैतन्य, ती जाणीव ह्याची सतत तुला जाणीव झाली पाहिजे. सतत स्मरण झालं पाहिजे.* ते इतकं झालं पाहिजे की, *त्या जाणीवेमध्ये स्वरूपाची जी विस्मृती आहे, त्या ठिकाणी जागृती झाली पाहिजे.
सच्चिदानंद स्वरूपामध्ये जी शुद्ध जाणीव आहे त्या शुद्ध जाणीवेमध्ये विसर म्हणजे “विस्मृती” झालेली आहे, *त्या ठिकाणी जागृती व्हायला पाहिजे. कशाची ? “स्वस्वरूपाची”!* आज आपल्याला स्वरूपाची विस्मृती झालेली आहे ती शुद्ध जाणीवेत झालेली आहे.
म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये म्हटले आहे, —
नष्टो मोहः स्मृतिर्लबधा। त्वत्प्रसादान्मयाच्युते।
स्थितोऽस्मि गतसंदेहः। करिष्ये वचनं तव।।
अर्जुन म्हणतो आता माझा संदेह गेला. तू सांगशील त्याप्रमाणे मी आता करीन.पूर्वी काय म्हणत होता,
मी करणार, मी मारणार, मी असा, मी तसा असं म्हणत होता. आता तसं म्हणत नाही.
आता, तुला मी शरण आलो, आणि तू सांगशील त्याप्रमाणे मी आता करणार. इतकी शरणागती त्याच्याकडे आली. कशामुळे? … त्याच्या ठिकाणी जी विस्मृती झाली होती ती जाऊन “स्मृती” जागृत झाली.हणून अर्जूनाची जी योग्यता होती ती लक्षात घेतली पाहिजे.
नाहीतर तुम्ही म्हणाल, ….
अर्जुनाला इतक्या लवकर साध्य कसं झालं ?
तर अर्जुनाची योग्यता फार मोठी होती. म्हणून त्याला लवकर जागृती आली. अर्जुनाच्या केसांतून सुद्धा “श्रीकृष्ण-श्रीकृष्ण” असा ध्वनी निघत होता असं सांगतात, एवढा अर्जुन हा फार मोठा साधक होता.
इतकंच नव्हे ज्ञानेश्वरी सांगताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी सुरूवातीलाच सांगितलंय, …..
“अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची ज्याची पात्रता आहे त्यांनी ज्ञानेश्वरी मी सांगतो ती ऐकावी”* असं ठणकावून सांगितलंय. नंतर त्यांनी स्वतःला सावरून घेतलं हा भाग वेगळा.
थोडक्यात …..
“नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा” गेलेली स्मृती त्याला प्राप्त झाली म्हणजे जागृती आली.*ही विस्मृती जाणीवेत झाली होती ती जागृती जाणीवेत आली. म्हणून जेव्हा जाणीवेत जागृती होते तेव्हा त्या आनंदाला पारावार नसतो.*
म्हणून तुकाराम महाराजांनी असं म्हटलय, …
बैसोनि निवांत शुध्द करी चित्त।
तया सुखा अंत नाही पार।।
येऊनी अंतरी राहिल गोपाळ।
सायासाचे फळ बैसलिया।।
तुकाराम महाराजांनी असं म्हटलय. याचे कारण हे आहे की, …..
सच्चिदानंद स्वरूप “मी” ही जागृती होते आणि या जागृतीने जो आनंद होतो .तो आनंद असीम आहे, तो आनंद अपार आहे, तो आनंद अपरंपार आहे आणि हा आनंद मिळविण्यासाठी साधना म्हणजे, …
“पहावे आपणासी आपण। या नांव ज्ञान।।”
— सद्गुरू श्री वामनराव पै
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस