💠भक्तिमार्गात भाव हा शब्द जेव्हां वापरला जातो तेव्हां त्याच्या पाठी “भोळा” हा शब्द जोडला जातो. भोळा भाव देवाला आवडतो म्हणून या भोळ्या भावाची कास धरण्यास संत सांगतात. परंतु भोळा भाव यासंबंधी बहुसंख्य लोकांत गैरसमजुती असल्याच्या आढळून येतात.

देवासंबंधी “बावळट, भोळसट व खुळचट” कल्पनांच्या आहारी जाऊन मन मानेल तसा देवासंबंधी भाव धरणे याला भोळा भाव म्हणत नाही. असा भोळा भाव असलेले लोकच परमार्थात फसतात किंवा बुवाबाजीला बळी पडतात.
✅”भोळा म्हणजे शुद्ध अंत:करणाचा, असा भोळा” या शब्दाचा “भावार्थ, परम अर्थ परमार्थ” आहे. *🙏"ज्ञानेशांचा संदेश"🌺*

“सार्थ हरिपाठ”
अभंग ४ था

प्रपंचात त्याचप्रमाणे परमार्थात सुध्दां श्रद्धेचे-भावाचे महत्व फार आहे.
देव डोळ्यांना दिसत नाही म्हणून तो आहे कशावरुन ? असा अविश्वास धरणे हे सुज्ञपणाचे लक्षण नाही.

संत मायबापांनी देव साक्षात् पाहिला म्हणजे त्याचा “प्रत्यक्ष अनुभव घेतला” व त्याच्या भक्तीने जीवाचे कल्याण होते, हाही सिद्धांत सांगितला.
✅या संतवचनावर पुर्ण विश्वास ठेवून भगवंताबद्दल अंतःकरणात नितांत श्रद्धा बाळगणे याला “भाव” असे म्हणतात. हा भाव नसेल तर हातून देवाची उपासनाच मुळी घडणार नाही व घडलीच तर तिला भक्तीचे रूप प्राप्त होणार नाही.

तात्पर्य, उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना नुसती कवायत होय व भाव असेल तर ती खरी भक्ती होय. या भक्तीतच खरी मुक्ती मिळण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून, ….. *कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित।* *उगा राहे निवांत शिणसी वाया।।*

देव कशाने प्रसन्न होईल व त्याच्या प्रसादाने मुक्ती कशी मिळेल ?
या तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की,
✅नाना प्रकारची साधने करून स्वतःला विनाकारण शिणवून न घेता “तू निवांत, शांत राहून” भक्तिभावाने हरिनामाचा अखंड जप कर.

तुकाराम महाराज हेच सांगतात, ..
बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त।
तया सुखा अंत पार नाही।।
येवोनि अंतरी राहील गोपाळ।
सायासाचे फळ बैसलिया।।
रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी।
मंत्र हा उच्चारी वेळोवेळां।।

पण नामस्मरण करण्यास फुरसत आहे कुठे ?
हा प्रश्न लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराज विचारतात, …..
सायासे करिसी प्रपंच दिननिशी।
हरिसी न भजसी कवण्या गुणे।।

“अरे ! प्रपंचासाठी तू रात्रंदिवस बैलासारखा राबतोस पण हरिचे भजन मात्र करीत नाहीस ते का बरे !”
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️स. प्र (sp)1028

error: Content is protected !!