“ज्ञानेशांचा संदेश”
       (प्रथम आवृत्ती १९६१)

“सार्थ हरिपाठ”
     अभंग ४ था

               भावेविण भक्ति, भक्तिविण मुक्ति।
                    बळेविण शक्ति बोलू नये।।
                    कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित।
                 उगा राहे निवांत शिणसी वाया।।
                 सायासे करिसी प्रपंच दिन निशी।
                  हरिसी न भजसी कवण्या गुणे।।
                      ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे। 
                             तुटेल धरणे प्रपंचाचे।

अभंगाचा भावार्थ :
भक्तीत म्हणजे उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना खरी नव्हे आणि *असल्या कवायती उपासनेने तुला मुक्ती प्राप्त होईल असे वाटत असेल, तर ते अंगात बळ नसताना शक्तीच्या गोष्टी बोलण्यासारखेच व्यर्थ आहे.

मग देव कशाने प्रसन्न होईल व त्याच्या प्रसादाने मला कशी मुक्ती मिळेल ?
असा प्रश्न जर तुझ्या ठिकाणी निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे.
व्यर्थ शीण न करता तु प्रथम निवांत, शांत हो व अखंड हरिनामस्मरण कर, त्यानेच हरि प्रसन्न होऊन तुला मुक्तिचा प्रसाद मिळेल.

रात्रंदिवस तू प्रपंचासाठी राबतोस, पण हरिचे भजन करण्यात मात्र आळस *करतोस ते का बरे ?
ज्ञानदेव महाराज सांगतात, ….
तुला जर या प्रपंंचाचे धरणे तुटावे, सुटावे असे वाटत असेल तर त्याला सोपा उपाय म्हणजे हरिच्या नामाचा अखंड जप करणे हाच होय.

थोडक्यात स्पष्टीकरण :

✅संत वाङमयात ”भाव” या प्रकाराला फार महत्त्वाचे स्थान असते.* त्याचप्रमाणे भाव हा शब्द संत वाङमयात अनेक अर्थी आलेला आहे. त्यामुळे भाव हा शब्द परमार्थात पडलेल्या लोकांना गोंधळात टाकणारा ठरतो.

✅ भाव या शब्दाचा संत खास उपयोग करतात तो एका विशिष्ट अर्थाने. *”भाव धरा रे, आपुलासा देव करा रे” किंवा ”भाव बळे आकळे एरव्ही ना कळे” वगैरे संतांची वचने भावाचे महत्त्व सांगणारी आहेत.

थोडक्यात, *”भाव”* म्हणजे *”संबंध”.
✅ देव आणि साधक यांच्यातील संबंध जर नीट उमजला नाही *तर अहंकाराचा ”समंध” साधकाच्या मानेवर बसून त्याला गोत्यात आणल्याशिवाय रहात नाही.

म्हणून खरा भाव नसेल, तर तथाकथित भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड किंवा कवायत होय. भाव कसा धरायचा हे सद्गुरूच शिकवू शकतात, किंबहुना भाव कसा धरायचा व देवाचा साक्षात्कार कसा करून घ्यायचा, हे शिकवितात तेच खरे सद्गुरू होत.
        
            भावेविण भक्ति भक्तिविण मुक्ति।
                   बळेविण शक्ति बोलू नये।।

हा अभंग किंचीत संवादरूप आहे. साधकाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वर महाराज त्यांची उत्तरे स्वतःच देत आहेत.

भावाची म्हणजे श्रध्देची काय आवश्यकता आहे ?
आंधळ्या श्रध्देने कसा परमार्थ घडेल ?
वगैरे प्रश्न कांही लोकांच्या ठिकाणी निर्माण होतात व श्रध्दावान असणे हे केवळ निर्बुध्दपणाचे लक्षण आहे असे ते समजतात, *पण हा समजच मुळांत निर्बुध्दपणाचा आहे.
कारण परमार्थ जरी बाजूला ठेवला , तरी प्रपंचात सुध्दां जर श्रध्दा नसेल तर आपला संसार सुखाचा होणार नाही.

व्यवहारातील जवळ जवळ सर्व गोष्टी आपण श्रध्देवर, एकमेकांच्या विश्वासावर करीत असतो. *हा विश्वास, ही श्रध्दा नसेल तर संसारचक्र बंद पडायला वेळ लागणार नाही.
(क्रमशः)
             — सद्गुरू श्री वामनराव पै
                  ✍️ स. प्र. (sp)1027

error: Content is protected !!