*”ज्ञानेशांचा संदेश”*
      (प्रथम आवृत्ती १९६१)

*”सार्थ हरिपाठ”*
     अभंग ३रा

   *ते हे श्रीहरिचे नाम। सर्व पातका करी भस्म।।*
            *अधिकारी उत्तम आणि अधम।*
                    *चारि वर्ण नरनारी।।*

वेदांचा अधिकार फक्त तीन वर्णानाच आहे, *तर नामाचा अधिकार चारही वर्णाना व स्त्रियांना आहे.* माणसे सुष्ट असोत किंवा दुष्ट असोत, उत्तम असोत किंवा अधम असोत, सज्जन असोत किंवा दुर्जन असोत, नामाचा अधिकार या सर्वानाच आहे.

*असे हे नाम संतांनी एकांतात बसून, सर्व सिद्धांतांचा अभ्यास करून, खोल ज्ञानदृष्टीने शोधून काढले व सर्व जनांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता उपलब्ध करून दिले.*

तुकाराम महाराज सुध्दां आपणाला हेच सांगतात, ….
      *सत्य साच खरे । विठोबाचे नाम बरे ।।*
            *सगुण निर्गुण तुज म्हणे वेद ।*
            *तुका म्हणे भेद नाही नामी ।।*
            *साराचेहि सार भक्तीचे भांडार ।*
              *नाम निरंतर गातां वाचे ।।*

ज्ञानेश्वर महाराज सुध्दां आपणाला अन्य ठिकाणी असेच सांगतात, …
       *सार सार सार विठोबा नाम तुझे सार।।*
            *तुज सगुण म्हणो की निर्गुण रे।*
               *सगुण निर्गुण एकु गोविंदु रे।।*
      
अशा रीतीने संतांनी ज्या गोष्टींचा व सिध्दांतांचा सारासार विचार आधीच केलेला असतांना *पुन्हां आपण तोच विचार करीत बसणे म्हणजे आपले आयुष्य व्यर्थ दवडण्यासारखे आहे.*
वास्तविक पाहता आपले आयुष्य *”माशी पांखु पांखडे तंव सरे” इतके क्षणभंगूर आहे . जीवनाचा बुडबुडा कुठल्या क्षणाला फुटेल हे सांगता येत नाही.*

अशी स्थिती असतांना साधकाने तत्वज्ञानाच्या अंतिम सिध्दांतांचा विचार करण्यांत वेळ घालविण्यापेक्षा, *तोच वेळ, आयुष्यातील प्रत्येक क्षण, नामस्मरणाच्या कारणी लावावा असे ज्ञानेश्वर महाराज साधकाला या ठिकाणी कळकळीने पुन्हां सांगतात.*

                 *”रिकामा अर्धघडी राहू नको”*
काही लोक पाच-दहा मिनिटं नामस्मरण करतात आणि म्हणतात झालं नामस्मरण. अशाने *आनंद, स्वानंद, गोविंद प्रगट होणार नाही. त्याचं मंथन झालं पाहिजे.*

त्यासाठी नामस्मरण सतत केलं पाहिजे. याचा अर्थ *”उद्योग, धंदा सोडून नव्हे, रिकामे असता तेव्हा”! हे “नामस्मरण” किंवा “विश्वप्रार्थना” म्हणा ही रवी आहे* आणि या रवीने तुम्हांला मंथन करावयाचे आहे.

आता मंथनाची क्रिया आहे त्यात *”नाम” आणि “भाव” They go together नामाच्या ठिकाणी भाव पाहिजे तरच मंथनाची क्रिया होईल.* नुसतचं नाम घेतलं तर मंथनाची क्रिया अगदी सावकाश होईल . पण *त्याच्या जोडीला भाव असेल तर मंथनाच्या क्रियेला जोर येईल व त्वरीत होईल, लवकर होईल.*
(क्रमशः)
              *— सद्गुरू श्री वामनराव पै*
                     *✍️ स. प्र. (sp)1025*

error: Content is protected !!