पुणे :
गणगौर राजस्थानातील एक भरजरीत सण. गण म्हणजे शिव अर्थात ‘इसरजी’ आणि ‘गौर’ अर्थात माता पार्वती.
राजस्थानी महिला जगाच्या पाठीवर कोठेही असो ती गणगौर साजरी करणार नाही असे होणे नाही. पुण्यातही हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नुकतीच याची सुरुवात झाली.

गण गौरचे महत्व अधोरेखित करणाऱ्या अनेक कहाण्यांपैकी एक अशी की, कामदेव अर्थात मदनला शंकाराने आपल्या तिसऱ्या नेत्रने भस्म केले. पण त्याची पत्नी रतीने खडतर तपश्चर्या करत शंकराला प्रसन्न केले आणि आपल्या पतीला पुनर्जीवीत करून घेतले.एका दुसऱ्या कथेप्रमाणे, हिमाचल पुत्री गौरीने सोळा दिवस उपवास करत पती म्हणून शंकरास मिळविले. त्याचे अनुसरण म्हणून गणगौर साजरी केली जाते.
होळीच्या राखेचे पिंड निर्माण करत गणगौरला सुरुवात होते. गौर ही जळालेल्या होलिकेचे पुनर्जन्मच. त्या राखेपासून ईसरजी अर्थात शंकर आणि गौर अर्थात पार्वतीची आकृती बनविली जाते.

काजळ, कुंकु, मेंदीने सोळा ठिपके देत रोज पूजा केली जाते. ही पूजा पतीच्या दीर्घायुष्यासाठी असली तरी पूजेचा प्रसाद मात्र त्यांला दिला जात नाही. सोळा दिवस चालणाऱ्या या सणाला नवविवाहिता आवार्जून माहेरी येतात.
गौरचे मुखवटे माथ्यावर घेऊन रोज़ सायंकाळी पारंपारीक गाणी गात गणगौरची मिरवणूक काढली जाते. ज्या स्त्रियांच्या माथ्यावर गौर असते, त्यांच्या उंबरठ्यावर त्यांचे पती गौरचे पूजन करतात. या स्त्रिया स्वतःला गौरची बहीण अर्थात ईसरजींच्या मेहुण्या समजतात.

गणगौरचे व्रत करणाऱ्या स्त्रियां तिचे विसर्जन होण्यापर्यंत एकभुक्त राहतात.
गुढी पाडव्या नंतरच्या तृतीयेला ‘गणगौर‘ समाप्त होते. त्याआधीचा दिवस ‘सिंजारा’ असतो. त्या दिवशी परगावी असलेला पती, आपल्या पत्नीसाठी आवर्जून घरी येतोच. तिला नवे कपडे, मिष्टान्न, आभूषणांची भेट देतो.
उपवर मुली, योग्य वर मिळावा म्हणून गौरचा उपवास करतात.
सोळाव्या दिवशी गणगौरचे नदी, तलाव, किंवा विहिरीवर विसर्जन केले जाते.

वसंत ऋतुच्या समारोपाच्या वेळी येणाऱ्या गणगौर सणाचे औचित्य घेत स्त्रियां येणाऱ्या काळात धरणीमाता सुजलाम सुफलाम राहावी अशी प्रार्थना करतात. जोधपुरची धिंगा गणगौर, नाथद्वाराची गुलाबी गणगौर जगप्रसिद्ध आहे.
गणगौर नंतर काही महिने राजस्थानात कोणतेही सण साजरे केले जात नाही अशी माहिती सत्येंद्र राठी यांनी दिली.

error: Content is protected !!