*बुडती हे जन न देखवे डोळा।*
*✅हिताचा कळवळा येतो यांचा।।*
*अशा कारुण्याने भरलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ जगाच्या कल्याणासाठी निर्माण केला.*
या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी *नामाचे तत्त्वज्ञान उभारले व त्या तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर नामस्मरणाचा गोड उपदेश अत्यंत प्रेमळपणे सांगितला.*

                   *”ज्ञानेशांचा संदेश”*

*सार्थ हरिपाठ*
   अभंग १ ला

          *”देवाचिया द्वारी उभा क्षणभरी”*

आता देवाचे द्वार म्हणजे काय ते पाहूं.
*देवाचे द्वार म्हणजे देवाची श्रद्धा होय. प्रपंचात आणि परमार्थात श्रद्धेला फार महत्व आहे.* या श्रध्देशिवाय प्रपंच सुध्दां सुखाचा होणार नाही. मग परमार्थाबद्दल तर बोलणेच नको! *सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास प्रपंचातील बहुतेक सर्व गोष्टी आपण श्रद्धेनेच करीत असतो.*

*”उद्या मी जगणार” या श्रद्धेवरच तो आज काम करीत असतो.*  डॉक्टरचे औषध घेऊन मी बरा होईन  या श्रद्धेवरच तो औषध घेत असतो. नाहीतर ते कडू औषध सुखा-सुखी कोण घेईल व त्यासाठी पाण्यासारखा पैसा तरी कोण खर्च करील हो! परंतु “उद्या जगणार” अशी श्रध्दा असलेले  “उद्या” मरत नाहीत असे नाही किंवा औषध घेऊन आपण बरे होऊ अशी श्रद्धा ठेवून औषध घेणारे मरत नाहीत असे थोडेच आहे!

परंतु गंमत अशी आहे की,
*प्रपंचात मुकाट्याने श्रद्धा ठेवणारे लोक परमार्थात मात्र श्रद्धा ठेवण्यास तयार नसतात.* ते म्हणतात, आम्ही आंधळ्या श्रद्धेचा कधीच स्वीकार करणार नाही. परंतु श्रद्धा ही नेहमीच आंधळी असते व त्या आंधळ्या श्रद्धेवरच संसारातील सर्व व्यवहार चाललेले असतात हे त्यांना सांगावयाचे कोणी ? असो!

प्रपंचात ज्याप्रमाणे श्रद्धेची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे परमार्थात सुध्दां तिची अत्यंत जरूरी आहे. *श्रद्धेशिवाय देवाची प्राप्ती म्हणजे “सच्चिदानंद स्वरूपाची” प्रतीती साधकाला होणेच शक्य नाही. ही आत्मानुभूति साधकाला भक्तिमार्गात केवळ भगवंताच्या कृपेने होते व ही भगवत्कृपा भगवन्नामानेच होते.* म्हणून ….

*भगवंत आहे व त्याची कृपा होते व त्याच्या कृपा-प्रसादाने “सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव” येतो, अशी श्रद्धा असणे अत्यंत जरूरीचे आहे.* कारण या श्रद्धेच्या द्वारातून भगवंताच्या चरणापर्यंत साधकाला जावयाचे असते.

व्यवहारात सुध्दां जर एकाद्याच्या घरी जाऊन त्यांना भेटावयाचे असल्यास आपल्याला प्रथम त्याच्या द्वारात उभे रहावे लागते व नंतर त्याला दाराची कडी वाजवून हाक मारावी लागते व दार उघडले गेल्यावर मग आपला घरात प्रवेश होतो. *त्याचप्रमाणे परमार्थात सुध्दां प्रथम देवाच्या द्वारात उभे रहावे लागते म्हणजेच त्याच्याबद्दल “अंतःकरणात श्रद्धा” असावी लागते. नंतर या द्वारात उभे राहून देवाला त्याच्याच नावाने तो ”ओ” म्हणेपर्यंत सतत हाक मारावी लागते व देवाचे दार उघडिले म्हणजेच त्याची कृपा झाली तर त्याच्या चरणापर्यंत प्रवेश मिळतो, त्याच्या “सच्चिदानंद स्वरूपाचा” साक्षात्कार होतो.* म्हणूनच भगवान गीतेत सांगतात —

              *”श्रद्धावान् लभते ज्ञानम्”।*
                                किंवा
       *अश्रद्धदानां पुरूषः धर्मस्यास्य परं तपः।।*

आता प्रश्न असा उभा राहतो की , देवाचे नांव किती वेळ घ्यावयाचे ?
*त्याला ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात , “क्षणभरी”, …. रिकामा क्षण नामाने भरी.*
याचा अर्थ असा की,
ज्याप्रमाणे रिकामे भांडे आपण पाण्याने किंवा दुधाने भरतो *त्याच प्रमाणे आयुष्यातील “प्रत्येक रिकामा क्षण” नामाने भरला पाहिजे.*

हरिपाठाच्या शेवटच्या अभंगात ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात —
              *सर्वसुख गोडी साही शास्त्रे निवडी।*
                   *रिकामा अर्धघडी राहूं नको।।*

तुकाराम महाराजांचा सुध्दां हाच उपदेश आहे —
                *हेचि सर्व सुख जपावा विठ्ठल।*
                  *न दवडावा पळ क्षण वांया।।*

*”क्षणभरी” या शब्दात ज्ञानोबांची “मेख” तर आहेच, शिवाय त्यांनी भगवंताच्या पुढे एक पाऊल टाकले आहे.*

गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात —
  *पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।*
       *तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।*

*भक्तीने अर्पण केलेले पान, फूल, फळ किंवा जल भगवंताला अत्यंत गोड लागते व अशा भक्तांचा भगवंत दास होऊन रहातो.* परंतु

भगवान ज्ञानेश्वर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की, भगवंताला पान, फूल, फळ किंवा जल हे ही अर्पण करण्याची आवश्यकता नाही. *तुमच्या आयुष्यातील जे रिकामे क्षण आहेत, तेवढे जरी तुम्ही नामाने भरून भगवंताला अर्पण केले तरी सुद्धां तो नामधारकाचा दास होऊन राहतो.*

श्रीसमर्थ रामदास स्वामीनी सुद्धां एके ठिकाणी हेच सांगितले आहे, —

*कांहींच न करोनि प्राणी। रामनाम वदे वाणी।।*
*तेणें संतुष्ट चक्रपाणी। भक्तांलागी सांभाळी।।*

* क्रमशः*
                    *— सद्गुरू श्री वामनराव पै*
                     (संदर्भ ग्रंथ : ज्ञानेशांचा संदेश)

error: Content is protected !!