गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच भारत.- संजय आवटे
तळेगाव स्टेशन:
“गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच भारत होय!” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी यांनी व्यक्त केले.
श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव-दाभाडे स्टेशन येथे श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘भारताचा पत्ता काय?’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना संजय आवटे बोलत होते.
ज्येष्ठ विधिज्ञ जीवन तनपुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्याख्याते राजेंद्र घावटे, श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, सचिव दिलीप राजगुरव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
“जातीपाती, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या देशाला भेडसावत आहेत. त्यामुळे जगात अनेक गोष्टींसाठी नावलौकिक प्राप्त असलेला आपला देश संस्कृती अन् उज्ज्वल परंपरा यांचे पुनरुज्जीवन केल्यास पूर्वीचा सुवर्णकाळ पुन्हा अनभवू शकेल!” असा आशावाद राजेंद्र घावटे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
दिलीप राजगुरव यांनी प्रास्ताविकातून श्री गणेश प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. व्याख्यानापूर्वी, गिर्यारोहण क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापन या दुर्मीळ विषयात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमित गुरव यांना प्रतिष्ठानकडून सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दीपाली गुरव यांनी त्यांच्या वतीने सन्मान स्वीकारला.
संजय आवटे पुढे म्हणाले की, “‘भारतमाता की जय!’ अशा घोषणा द्यायला हरकत नाही; पण स्वातंत्र्य चळवळीत जेव्हा या घोषणा दिल्या जात होत्या तेव्हा अफूच्या गोळ्या खाऊन झोपणाऱ्यांनी हे नागरिकांना सांगावे, हा दांभिकपणा आहे. सन २०१४ पासूनच देशाच्या विकासाला सुरुवात झाली, असे चित्र निर्माण केले जात आहे.
एकोणिसाव्या शतकात जॉन स्ट्रेची या ब्रिटिश अधिकाऱ्याने भारताविषयी दिलेल्या सात व्याख्यानांतून ‘भारत हा देश म्हणून अस्तित्वातच नाही; कारण त्याच्या प्रांता-प्रातांमध्ये प्रचंड भिन्नता आहे!’ असे प्रतिपादन केले होते; तर विन्स्टन चर्चिल यांनी १९४० मध्ये ‘भारत ही फक्त भौगोलिक अभिव्यक्ती आहे!’ अशी मांडणी केली होती. नाना भाषा, अनेक धर्म अन् पंथ, भौगोलिक वैविध्य आणि प्रचंड लोकसंख्या अशा आव्हानांवर मात करून स्वातंत्र्योत्तर काळात भारत उभा राहिला आहे.
गांधी, नेहरू, पटेल होते म्हणून देशाचे फक्त दोनच तुकडे झाले; अन्यथा असंख्य तुकड्यांमध्ये भारत विखुरला गेला असता. सरदार पटेल यांचा पहिला पुतळा गुजरातमध्ये उभा राहिला अन् त्याचे अनावरण पंडित नेहरू यांनी केले होते. गांधी, नेहरू, पटेल या महापुरुषांमध्ये तात्त्विक मतभेद असले तरी त्यांचे कार्य परस्परपूरक होते; परंतु विपर्यस्त अन् विकृत इतिहास जाणीवपूर्वक निर्माण केला जातो आहे.
१९१६ सालानंतर गांधी भारतात आले अन् अवघ्या चार वर्षांत लोकनेते झाले. त्यांच्यासोबत टाटा, बिर्ला होते; तर सर्वसामान्य लोकांचे शहाणपण त्यांनी जागृत केले. सध्याचा भारत हा नेहरूंच्या संस्थात्मक बांधणीच्या पायावर उभा राहिला आहे. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आणि खंडणमंडण प्रक्रिया मांडता येणे, हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे.
आम्ही सर्वसामान्य भारतीय लोक भारतीय संविधानाचे पंचप्राण आहोत. तरीही जातीधर्मांमध्ये विखुरले जाणे हे आपले मोठे वैगुण्य असून सौहार्द टिकवून ठेवणे हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी सर्वसामान्य माणसे हीच देशाची मोठी आशा आहे!” सुरेश भट यांच्या कवितेने त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.
बच्चुशेठ तांबोळी, राजेश सूर्यवंशी, उमाकांत महाजन, मयूर राजगुरव, गुंजन शहा, बाळासाहेब कुतळ, चंद्रकांत घोजगे, रामभाऊ कदम यांनी संयोजनात सहकार्य केले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन केले. महादेव वर्तले यांनी आभार मानले.