वनक्षेत्र विभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे अतिक्रमणात वाढ
इंदोरी:
  वनपरिक्षेत्र वडगाव मावळ विभागाच्या दुटप्पी भूमिकेने इंदोरी ,जांबवडे वनक्षेत्रात अतिक्रमणे वाढत असल्याची शक्यता बळावत आहे. वनक्षेत्र विभागाने एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय  ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.अशी प्रतिक्रिया  बी.एम.भसे सह अनेक व्यावसायिक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
 
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर  पायथ्याचे राखीव मोकळ्या
क्षेत्रात (इंदोरी गट क्र.४०८) अनेकांनी व्यावसायिक जाहिराती लावल्या असल्याची बाब निदर्शनास आल्यावर वनक्षेत्र विभागाने संबंधित अतिक्रमण केलेल्या जाहिरातदारांना तातडीने नोटिसा (जा.क्र.८८१/२०२२-२३ दि.१७/८/२०२२) बजावल्या.

काही जणांनी नोटिसेचा आदर करीत जाहिरात फलक तातडीने काढले.परंतू नोटिसांना ७–८ महिने होऊनही काही संबंधितांनी जाहिरात फलक अद्याप काढलेले तर नाहीच. उलट  जाहिरात फलकांची संख्या वाढली आहे.शिवाय फलकांना नव्याने लाईटची सोय करण्यात आली आहे.
याकडे वनक्षेत्र विभाग का दुर्लक्ष करीत आहे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

ज्यांनी नोटिसांचा आदर करीत अतिक्रमणे काढली.त्यांची  चूक झाली काय ? की वनक्षेत्र पाल गेल्या ६ महिन्यात इकडे फिरकलेच नाहीत काय ?की अतिक्रमणांना वनक्षेत्र विभागाचा आशीर्वाद आहे. असे समजायचे का ? अशी शंका बी.एम.भसे व अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.

नोटिसा देऊन ही अतिक्रमणे हटवली गेली नाहीत.याबाबत
वनपाल डी.एम.ढेंबरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधितांना पुन्हा नोटिसा देऊन दंडात्मक
कारवाई सह वनविभाग अतिक्रमणे हटवणार. परंतू ७-८ महिने लोटले पण अद्याप काहीच कारवाई झालेली नाही.उलट अतिक्रमणांत वाढ झाली. असे भसे यांनी स्पष्ट केले.

इंदोरी जांबवडे हद्दीतील वनक्षेत्र विभागातील अतिक्रमणे,लाकूड फाट्याच्या चोऱ्या,वनक्षेत्र विभागात बेकायदा चरणारी जनावरे व शेळ्यामेंढ्या या बाबींची  वनपरिक्षेत्रपाल यांनी त्वरीत दखल घेऊन
कायदेशीर चौकशी करावी.

अन्यथा वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अशा कारभाराची तक्रार जिल्हा व राज्य वनक्षेत्र विभाग तसेच लोकप्रतिनिधी व वन मंत्रालयाकडे करावी लागेल.प्रसंगी उपोषण आंदोलनाचा मार्ग ही अवलंबवा लागेल.असा इशारा भसे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!