पांडुरंग देशपांडे__ प्रारब्धाची परिणीती…
      पांडुरंग देशपांडे …
      भंडारी हॉस्पिटलच्या सकाळच्या नेहमीच्या राऊंड नंतर मी तळेगाव जनरल हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी पाठविलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी गेलो होतो.
     त्याठिकाणी सहजच एका रुग्णाकडे माझं लक्ष गेलं .
    त्या रुग्णाच्या खाटेशेजारी स्टुलावरती अन्नाचे ताट वाढून ठेवलं होतं. उघड्यावर असल्यामुळे काही माश्या घोंगावत होत्या.
   
      दुपारची वेळ म्हणजे भुकेची वेळ !
   असून सुद्धा हा रुग्ण अन्नग्रहण का करीत नाही असा विचार मनात येऊन मला संताप आला .
   म्हणून मी  त्या  तिरमीरीतच त्या रुग्णासमोर उभा राहिलो आणि त्यांना प्रश्न विचारला ,
” *अहो भुकेची वेळ आहे, समोर अन्न आहे ,घोंगावणाऱ्या माशांमुळे ते दूषित होत चालल आहे ,तुम्ही ते का घेत नाही* ?”

     त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिले त्या नजरेत असहाय्यता होती ,कारुण्य होते .
    मला त्याने खुणेनेच सांगितले की माझ्या अंगावरची चादर बाजूला करा चादर बाजूला केल्याबरोबर मला त्यांच्या आजाराची कल्पना आली कारण त्यांच्या दोन्ही हातापायाची शक्ती नाहीशी झालेली होती.
      हा ‘Quadriplegia ‘ चा पेशंट आहे हे माझ्या डॉक्टरी नजरेने ओळखलं !
   हीच माझी आणि त्यांची पहिली भेट ते म्हणजे पांडुरंग देशपांडे!
  
       आता माझी संतापाची जागा सहानुभूतीने घेतली होती त्यामुळेच माझ्या चौकशीच्या शब्दात मृदू आणि हळुवारपणा आला होता .
    देशपांडे यांनी सांगितलेल्या त्यांच्या करुण कहाणीतून मला सर्व परिस्थितीची कल्पना आली.
    मज्जारज्जू आणि स्नायूंच्या विकारांमुळे देशपांडे यांच्या प्रथम हातांची नंतर पायांची शक्ती हळूहळू नाहीशी होत चालली होती आणि उपलब्ध असलेल्या कुठल्याही उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे पांडुरंग देशपांडे अशा विकलांग अवस्थेमध्ये होते.
   
     *स्वतःच्या हाताने एक चमचाभर पाणी सुद्धा ते घेऊ शकत नव्हते .अशा अवस्थेत त्यांच्या पत्नी व मुलाने त्यांची साथ सोडली आणि त्यांची रवानगी तळेगाव जनरल हॉस्पिटल मध्ये केली होती*.
     त्यामुळे समोर चहा नाष्टा जेवण जरी आलं तरी जोपर्यंत एखादा वॉर्डबॉय किंवा नर्स त्यांना तो ,चहा-नाश्ता देऊ शकत नव्हते, तोपर्यंत ते काही करू शकत नव्हते .
    अशी त्यांची दयनीय अवस्था झालेली होती .मग मी मनाशी ठाम निर्णय घेतला.
   
     ठरल्याप्रमाणे मी भराभर पाऊले उचलली .त्यांना पटवर्धनांच्या वृद्धाश्रमात हलवलं कारण तिथे अनेक माणसांचा राबता होता आणि मी पण त्यांना माझी वैद्यकीय सेवा देऊ शकत होतो .
    *पांडुरंग देशपांडेंना वृद्धाश्रमात अशी खोली देण्यात आली की, जेथे येता-जाता कुणाचेही लक्ष वेधले जायचं* .
    त्यामुळे हातापायाची शक्ती सोडली तर देशपांडे यांच्या प्रकृतीत झपाट्याने बदल जाणवायला लागला. योग्य वेळी योग्य आहार ,कोणीतरी आपली काळजी घेत आहे हा मानसिक आधार त्यांना सुखावणारा ठरला.
   
      त्यामुळे निस्तेज आणि म्लान चेहऱ्यावर मनात असलेल्या तृप्तींच,समाधानाचं प्रतिबिंब दिसायला लागलं .
     *मुळातच बुद्धिमत्तेने तरल असलेले देशपांडे हे संस्कृत आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते .त्यामुळे रोज सकाळी ज्ञानेश्वरी ,तुकारामांची गाथा, रामदासांचे मनाचे श्लोक यांचे निरूपण ते करायचे आणि वृद्ध आश्रमातील सर्व मंडळी त्यांचे निरूपण मनापासून ऐकायचे*.
      त्यामुळे दोन-तीन महिन्यातच पांडुरंग देशपांडे अतिशय उत्साही, हसर्‍या चेहर्‍याने ,स्वागत करणार सर्वांना हवंहवंसं वाटणारं असं व्यक्तिमत्त्व दिसायला लागलं .
     
     एक दिवस मी त्यांना सहज प्रश्न विचारला की,” देशपांडे काका अजूनही तुम्ही पूर्णपणे परावलंबी आहात ,दुसऱ्याने मदत केल्याशिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकत नाही हे कटू सत्य आहे ,तर अशा अवस्थेत जर तुम्हाला  मरण आलं तर ते तुम्ही स्वीकाराल का ?”
      माझा प्रश्न ऐकल्यानंतर देशपांडे काका थोडे हसले ,ते म्हटले नाही ! *डॉक्टर मला अजून जगावसं वाटतं का कुणास ठाऊक पण मला या देहाचा मोह सुटत नाही* .
     त्याचे उत्तर ऐकल्यानंतर माझा अपेक्षाभंग झाला आणि नकळत मला एका साधूच्या गोष्टीची आठवण झाली.
     काही वर्षांपूर्वी आपल्या भारतात अंतर्ज्ञानी असलेले एक साधू पुरुष होऊन गेले ते त्रिकाळ ज्ञानी होते .
    
    त्यामुळे त्यांना पुढचा जन्म माहित होता आणि तो म्हणजे डुक्कराचा .त्यांनी आपल्या परम शिष्याला बोलाविले आणि सांगितले हे बघ माझा पुढील जन्म रात्रंदिवस घाणीत लोळणाऱ्या एका डुकराचा आहे.
    मी हा देह ठेवल्यानंतर तु या  गादीवर बसणार आहे. पांढरा टीका असलेला एक डुक्कर तुझ्याजवळ येईल .त्याला तुझ्या जवळ असलेल्या भाल्याने त्याचा वध कर की, ज्यामुळे मला मुक्ती मिळेल. कालांतराने त्या साधूने देह ठेवला आणि त्यांच्या गादीवर विराजमान झालेल्या त्या शिष्याच्या समोर पांढरा ठिपका असलेला डुकर आला .
   
     *ठरल्याप्रमाणे तो शिष्य उगारून त्याचा वध करणार त्यावेळी ते डुक्कर त्याला म्हणतोय कि ,मला मारू नको.मी या देहातच आनंदी आणि समाधानी आहे* .
    मित्रांनो या कथेचा सत्य असत्येत मी जात नाही .पण प्रत्येकाला आपला देह कसाही असो पण त्याचा मोह सुटत नाही. पण त्यासाठी फक्त जगण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ,ध्येय हवं असतं .
   
     आज पांडुरंग देशपांडे ह्यात नाही ,पण त्यांनी  जो मला विचार दिला तो अजूनही मी विसरू शकत नाही .
   आजही कोणी असहाय्य विकलांग अवस्थेत एखादा रुग्ण माझ्या समोर येतो, त्यावेळी मी निराश न होता यथाशक्ती त्याच्यात उत्साहाची ऊर्जा भरून त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो कारण त्यांच्यात मी पाहत असतो, अनुभवत असतो पांडुरंग देशपांडे….
      आजचा विषय आपल्या
सर्वांपर्यंत पोहोचला असेल म्हणून मी येथेच थांबतो .
  ( शब्दांकन- ला.डॉ. शाळिग्राम भंडारी )

error: Content is protected !!