खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळच्या वैष्णव आडकरने पटकावले रौप्यपदक
लोणावळा:
मध्यप्रदेश भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील शिवली गावचा राष्ट्रीय पदक विजेता युवा मल्ल पै. वैष्णव नारायण आडकर याने ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. वैष्णवचे चार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे दुसरे रौप्यपदक आहे.

मावळ पुणे जिल्हा व  तालुक्यात कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवली गावचा राष्ट्रीय पदक विजेता युवा मल्ल पै. वैष्णव नारायण आडकर याने मध्यप्रदेश भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात ६५ किलो वजनी गटात रुपेरी कामगिरी केली आहे. त्याने गटातील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत अत्यंत अतितटीच्या लढतीत हारीयाणाच्या मल्लाकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

वैष्णव याची हि चौथी राष्ट्रीय स्पर्धा होती. चार राष्ट्रीय स्पर्धेत दोन स्पर्धेत पदके पटकाविली आहे. यामध्ये रांची झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ६३ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते. तर हरीद्वार व हारीयाणा येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर राज्य शालेय कुस्ती स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले आहे. वैष्णव हा शिवली गावातील राष्ट्रीय स्तरावर खेळलेला सहावा राष्ट्रीय कुस्तीगीर आहे. यामध्ये त्याचा भाऊ राष्ट्रीय कुस्तीगीर विपुल आडकरचाही समावेश आहे.

वैष्णवचे वडील पै. नारायण आडकर व आजोबा स्वर्गीय दशरथ आडकर हे जिल्ह्यातील नामवंत कुस्तीगीर होते. वैष्णव हा वारजे, पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे व किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे. वैष्णव याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे ऑलिंपिकवीर पै. मारुती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सरचिटणीस पै. मारुती बहिरु आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, सचिव पै. बंडू येवले, सहसचिव पै. पप्पू कालेकर, उपाध्यक्ष पै. सचिन घोटकुले, पै.मनोज येवले, पै. तानाजी कारके, पै. विष्णू शिरसाट, पै. राजू बच्चे, पै. देविदास कडू, पै. निवृत्ती काकडे यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!