टीजीएच ऑन्को- लाइफ कॅन्सर हॉस्पिटलचे शुक्रवारी उद्घाटन
तळेगाव स्टेशन:
तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित ऑन्को लाइफ कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे शुक्रवारी (दि. ११) ला सकाळी साडेदहा वाजता विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे असतील. महाराष्ट्रातील तिसरे केमो मशिन इथे असेल. फक्त कर्करोगावरील उपचारांसाठी समर्पित आणि १० खाटांच्या अतिदक्षता विभागाचे असे हे एकमेव रुग्णालय आहे. मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उद्घाटन कार्यक्रमास मावळचे खासदार श्रीरंग
बारणे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, एच. व्ही. देसाई, आय हॉस्पिटलचे चेअरमन राजेश शहा, अध्यक्ष नितीन देसाई, उद्योजक चंद्रकांत गोग्री, अजित मुथा यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि कॉन्व्हलसंट होमचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माफक दरात कॅन्सरवर उपचार या रुग्णालयात गरजूंना मिळू शकणार असल्याचे सभापती शैलेश शाह यांनी सांगितले.यावेळी  चंद्रभान खळदे, डॉ. शाळिग्राम भंडारी, विनायक अभ्यंकर, डॉ. प्रतापराजे, डॉ. मनोज तेजाणी, डॉ. अजय ढाकेफळकर उपस्थित होते.
तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड कॉन्व्हलसन्ट होम या संस्थेला ९७ वर्षाचा इतिहास आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दि. १४-११-१९४५ रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटलला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्या हस्ताक्षरातील संदेश आजही आपल्याला पहायला मिळतो. तसेच भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री श्री. यशवंतरावजी  चव्हाण यांच्या उपस्थितीत दि. ३१-१०-१९७६ रोजी हॉस्पिटलचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. त्यावेळी यशवंतरावजींच्या हस्ताक्षरातील  संदेशाचे ही संस्थेने जतन करून ठेवले आहे.
२७ डिसेंबर २००० रोजी या संस्थेच्या अमृतमहोत्सवाचा सांगता समारंभ नवीन हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री  शरदचंद्रजी पवार  यांच्या हस्ते झाले होते.
अध्यक्ष गणेश  खांडगे म्हणाले,” १९२५ साली डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांनी तळेगाव जनरल हॉस्पिटल सुरू केले. या हॉस्पिटलचे उद्घाटन मा. श्री. न. चिं. केळकर यांनी केले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेला माफक दराने किंवा मोफत तत्वावर औषधोपचार मिळाला पाहिजे हा कृतीशील विचार डॉ. सरदेसाईच्या मनात होता. मिशनरी वृत्तीने रुग्णांची सेवा करण्याचा त्यांचा पिंड होता.
त्यामुळे तळेगाव जनरल हॉस्पिटल सुरू करण्यासाठी संपूर्ण योगदान दिले. डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांनी आयुष्यभर त्यागी आणि निःस्वार्थी वृत्तीने, अगदी आपले स्वतः चे अपत्य असावे अशा पद्धतीने हे हॉस्पिटल चालविले. डॉक्टर स्वतः परदेशात राहिलेले, एडिंबरो वूल्मर हॅम्प्टन येथे शिक्षण-प्रॅक्टिस केलेले, अनेक नेत्रशस्त्रक्रियांचा अनुभव, त्या काळात मुंबईत बोटावर मोजण्याइतकेच नेत्रतज्ज्ञ- अशी पार्श्वभूमी असताना त्यांनी ठरविले असते.
  तर अमाप पैसा मिळवता  आला असता. पण डॉक्टरांची वृत्ती सेवाभावी होती. प्रवृत्तीत ‘मिशनऱ्यांचे तत्व’ होते. परदेशातून माणसं या देशात येतात आणि मिशनरी म्हणून रुग्णसेवा करतात तर आपण हे तत्व आचरणात का आणू नये, आपल्या ग्रामीण भागाताली असहाय्य रुग्णांच्या व्यथा-वेदना दूर करण्याचा प्रयत्न का करू नये, हा विचार, ही तळमळ त्यांच्या मनात सतत जागी होती.
प्रारंभीच्या काळात हॉस्पिटलचे स्वरुप ‘नेत्ररुग्णालय’ असे होते. नंतरच्या काळात नेत्रविभागाबरोबर अनेक विभाग सुरू झाले. प्रामुख्याने ‘क्षयरोगचिकित्सा विभाग’ (टी. बी. सॅनिटोरियम) सुरू झाला. मावळ-पुणे परिसरातील, महाराष्ट्रातील बहुतेक दुर्गम भागातून उपचारांसाठी रुग्ण येऊ लागले. त्यांचे नातेवाईकही येत असत. क्षयरुग्णासाठी झोपड्या (हटस्) उभारल्या गेल्या. अनेकांनी डॉक्टरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देणग्यांच्या रुपाने आर्थिक मदत देऊ केली.
१९४५ साली राष्ट्रपिता स्व. महात्मा गांधीजींनी भेट दिली. आणि डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांचा मुक्त कंठाने गौरव केला.आज तळेगाव जनरल हॉस्पिटलचे रुपांतर.महावृक्षात झाले आहे.बाह्यरुग्ण विभाग, अद्ययावत लॅबोरेटरी, एक्सरे विभाग, अल्ट्रा-सोनोग्राफी विभाग, मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडिक, स्त्री-रोग, प्रसूतीविभाग, मानसोपचार विभाग, बालरोग विभाग, त्वचारोग विभाग, कान नाक-घसा विभाग, नेत्रोपचार विभाग, विशेष क्षय रुग्ण कक्ष (मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी. ई. एस. टी., आर. जे. मेहता ट्रस्टच्या क्षय रुग्णांसाठी विशेष विभाग) अतिदक्षता विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, रक्तपेढी, कुटुंबनियोजन केंद्र, कॅज्युल्टी विभाग, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, कामगार राज्य विमा योजना निदान केंद्र, पॅनेल डिस्पेन्सरी, २४ तास अॅम्ब्युलन्स सेवा, रुग्णांच्या भोजनव्यवस्थेसाठी स्वतंत्र मेस अशा अनेक रुग्णसेवा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
पुणे मुंबई शहराच्या मध्यावर असलेल्या तळेगाव शहरात तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित ऑन्को-लाईफ कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू होत आहे.
ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर्स हे कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची चेन म्हणून ओळखले जाणारी संस्था असून ही संस्था  श्री उदय देशमुख यांनी 2014 साली साताऱ्याला स्थापन केली. श्री देशमुख यांना भारतातील आणि परदेशातील कॅन्सर वरील रेडिएशन संदर्भातील उपचारांचा 38 वर्ष अनुभव आहे. अकोलाइफ कॅन्सर सेंटर्स हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम अशा कॅन्सर हॉस्पिटल असणारी संस्था आहे. आणि या संस्थेचे हॉस्पिटल सातारा, कराड, चिपळूण, गडहिंग्लज आणि आता तळेगाव येथेही आहेत.
त्यापैकी सातारा व चिपळूण येथील हॉस्पिटल ला एन ए बी एच ची सुद्धा मान्यता मिळालेली आहे. इंडिया अचिवस अवॉर्ड हा पुरस्कार देखील साताऱ्याच्याऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरला मिळालेला आहे. सर्वोत्तम सुपर स्पेशलिटी कॅन्सर हॉस्पिटलचा पुरस्कार ही साताऱ्याच्या हॉस्पिटल ला मिळालेला आह. क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया ने देखील या संस्थेला आरोग्य विषयक सेवा आणि ऑपरेशनल अँड मॅनेजमेंट एफिशियन्सी साठी पुरस्कृत केलेले आहे.
  तसेच चिपळूण येथील ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर  हे लाईफ केअर हॉस्पिटल च्या सहकार्याने सुरू केलेले आहे येथे आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि खास करून पेट सिटी ची व्यवस्था ही आमच्या चिपळूणच्या हॉस्पिटलमध्ये आहे.
त्यामुळे कॅन्सरचे लवकर निदान व उपचार होऊन सर्व कॅन्सरग्रस्त रुग्णांना कॅन्सर मुक्त करण्याचे आमचे प्रयत्न राहतील.कराड येथीलऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर हे सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने सर्व सोयीने युक्त असे सुरू केलेले आहे येथे सर्व शस्त्रक्रिया रेडिएशन व रक्तातील कॅन्सरवर उपचार व तपासण्यांची सोय केलेली आहे.
      आता तळेगांव येथे आता आम्ही सर्व सोयींनी सुसज्ज असे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करत आहोत. येथे कॅन्सरचे निदान व उपचारांची संपूर्ण सोय केलेली आहे. येथे शस्त्रक्रिया, रेडिएशन उपचार पद्धतीतील सर्वात प्रगत असे *Tomography with syncrony* ही सुविधा असणारी मशिनरी असून, पेट सिटी स्कॅन, मॅमोग्राफी 2 D Echo आय एच सी, ट्युमर मार्कर आणि इतर कॅन्सर विषयक रक्ताच्या सर्व तपासण्यांची सोय आहे. या हॉस्पिटल मध्ये शंभर बेडची व्यवस्था आहे.

error: Content is protected !!