टाकवे बुद्रुक येथे अध्यात्म आणि शैक्षणिक मूल्यांवर आधारित दिंडीचा सुंदर उपक्रम

विद्यार्थ्यांचा ‘विठ्ठल प्रेम सोहळा’ उत्साहात साजरा

टाकवे बुद्रुक येथे अध्यात्म आणि शैक्षणिक मूल्यांवर आधारित दिंडीचा सुंदर उपक्रम

टाकवे बुद्रुक :
आषाढी एकादशीनिमित्त टाकवे बुद्रुक येथील बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडियम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा उत्साहात आणि श्रध्देने साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना अध्यात्मिकतेशी जोडणारा व पारंपरिक वारशाची ओळख करून देणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.

या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव आदी संतांची वेशभूषा परिधान केली होती. काही विद्यार्थिनींनी तुळशीचे रोप, विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती, धार्मिक ग्रंथ डोक्यावर घेत पारंपरिक वेशात सहभाग नोंदवला. वारकरी संप्रदायाचे दृश्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारले गेले.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली. ही मिरवणूक विठ्ठल-रखुमाई मंदिरात पोहचल्यावर विद्यार्थ्यांनी अभंग व भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर खंडोबा चौकात गोल रिंगण करण्यात आले. “विठ्ठल-विठ्ठल” चा गजर, फुगडी खेळ आणि गोड भजने यांनी वातावरण आनंदमय झाले.

यानंतर गावातील भैरवनाथ मंदिरात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी संयुक्त भजन-कीर्तन सादर करून भक्तीमय वातावरण निर्माण केले. या संपूर्ण दिंडीत नर्सरीपासून दहावीपर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. पावसाची तमा न बाळगता सर्वजण विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले.

या उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले म्हणाले,

> “विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त आणि संस्कार रुजवणारा हा उपक्रम म्हणजे शिक्षणाचे खरे स्वरूप आहे. वारकरी परंपरेचा संस्कार शालेय वयात झाल्यास, भावी पिढी जबाबदार नागरिक म्हणून घडते.”

संस्थेचे सचिव रामदास वाडेकर म्हणाले,

> “आमची संस्था केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. अशा उपक्रमातून संस्कार, परंपरा आणि सामाजिक भान रुजवले जाते.”

हा उपक्रम ग्रामस्थ, पालकवर्ग आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही विशेष दाद देत कौतुकास्पद ठरवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!