



पिंपरी :
आषाढी एकादशीचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पवित्र सण साजरा करताना स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीने एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला. पुण्याजवळील पुनावळे-काटे वस्ती आणि वाकड-कसपेटेवस्ती येथील तसेच अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील अकॅडमीच्या ऑनलाईन विद्यार्थ्यांनी भावपूर्ण स्वरांमधून विठ्ठलनामाचा गजर केला.
साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यांपासून विविध वयोगटातील मुलांनी पारंपरिक पोशाखात, हातात टाळ-मृदुंग घेत भक्तीमय अभंग गात पायी दिंडीत सहभाग घेतला. ‘स्वरात भक्ती, भक्तीत संस्कार’ असा मंत्र देणारी ही स्वरदिंडी कस्पटे वस्ती येथून निघून छत्रपती चौक मार्गे विठ्ठल मंदिरात विसावली.
पालकही या वारीत सहभागी झाले. ‘रखुमाई रखुमाई’सारख्या भक्तिगीतांवर सहगायन करत त्यांनी भावनिक एकात्मता साधली. दिंडीच्या वाटेवर विठ्ठलनामाच्या गजराने परिसर भारावून गेला होता.
अध्यात्मिकतेसोबतच शिक्षणाचा पाया बळकट
स्वरोपासना अकॅडमी केवळ संगीत शिकवण्यापुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी भारतीय सांस्कृतिक मूल्ये रुजवण्याचे कार्य करत आहे. शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भक्तीची गोडी आणि अनुशासनाचे धडे देत ही संस्था विद्यार्थ्यांना सुरांच्या साक्षात पंढरीत घेऊन जाते.
कार्यक्रमात अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी ‘अंतरंगातला देव’, ‘खेळ मांडीयेला’, ‘कानडा राजा पंढरीचा’ यांसारखी भक्तिगीते सादर केली. विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आनंद कस्पटे आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, हिरामण कस्पटे यांनी संपूर्ण स्वरोपासना परिवाराचे स्वागत केले.
स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी म्हणाले, “संगीत ही साधना आहे. या साधनेतूनच मुलांच्या मनामध्ये भक्ती, शिस्त आणि आत्मिक समाधानाचे बीज रोवले जाते. याच हेतूने आम्ही आषाढी एकादशीसारख्या उत्सवांचे आयोजन करतो.”
पालकांचा सक्रीय सहभाग – एक नवीन संस्कारदृष्टिकोन
या संपूर्ण उपक्रमात केवळ मुले नव्हे, तर पालकही तितक्याच उत्साहाने सहभागी झाले. वारकरी पोशाख परिधान करून मुलांबरोबर त्यांनी पारंपरिक वारीचा अनुभव घेतला. या सामूहिक सहभागामुळे मुलांमध्ये कुटुंबव्यवस्था, परंपरा आणि अध्यात्म यांचे महत्त्व लहान वयातच रुजवले जात आहे.
सांस्कृतिक मूल्यांची पिढीपरंपरा जपणारा उपक्रम
स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचा हा उपक्रम म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे, तर संस्कारांची शाळा आहे. इथल्या प्रत्येक सुरामध्ये अध्यात्माचे सामर्थ्य आहे, आणि त्या सुरांमधूनच उद्याचे सुसंस्कृत नागरिक घडत आहेत.

- टाकवे बुद्रुक येथे अध्यात्म आणि शैक्षणिक मूल्यांवर आधारित दिंडीचा सुंदर उपक्रम
- संस्कारांची पंढरी : स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या चिमुकल्यांची स्वर दिंडी उत्साहात संपन्न
- ‘गाता रहे मेरा दिल’च्या बिग बी मैफलीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद
- जातीधर्म विसरून एकोपा जपा : राधाबाई वाघमारे यांचे मोलाचे विचार
- ॲड. रामराजे भोसले पाटील पश्चिम महाराष्ट्र नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष नियुक्त

