‘गाता रहे मेरा दिल’च्या बिग बी मैफलीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

‘गाता रहे मेरा दिल’च्या बिग बी मैफलीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

पिंपरी (प्रतिनिधी):
इंडियन म्युझिकल क्लबने आयोजित केलेल्या ‘गाता रहे मेरा दिल’ या अमिताभ बच्चन विशेष संगीत मैफलीला रसिक श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. क्लबच्या २८व्या संगीत पर्वांतर्गत निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) ही रंगतदार मैफल झाली. महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांची ही संगीतमय झलक होती.

राखी झोपे यांची निर्मिती संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या समर्पित संयोजनातून ही मैफल साकारण्यात आली. या कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील मान्यवर हिरामण राठोड, दिलीप काकडे, जयराम शर्मा आणि किरण वाघेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मैफलीची सुरुवात आषाढी एकादशीनिमित्त एक भक्तिगीत – ‘कानडा राजा पंढरीचा’ आणि अभंग सादर करून झाली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर आधारित एक भावस्पर्शी कविता वाचण्यात आली, ज्याने वातावरण भारावून गेले.

कलाकारांचा सुरेल संगम:
विजय किल्लेदार, भारती किल्लेदार, अनिल झोपे, शामकुमार माने, वैशाली रावळ, मनोज येवले, तरुण कुमार, श्रीया दास, अदिती खटावकर, माधवी पोद्दार, पंकज श्रीवास्तव, राजेंद्र गावडे, दीपक निस्ताने, संदीप पाचारणे, विवेक सोनार, डॉ. गणेश अंबिके आणि अमित पांचाळ या गायक कलाकारांनी एकल, युगुल व गटगीतांच्या स्वरूपात विविध गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण केले.

गाण्यांची खास निवड:
‘छू कर मेरे मन को…’, ‘कभी कभी मेरे दिल में…’, ‘देखा एक ख्वाब तो…’, ‘ओ साथी रे…’, ‘तेरे मेरे मिलन की…’, ‘रिमझिम गिरे सावन…’, ‘आदमी जो कहेता हैं…’, ‘सारा जमाना हसीनों का दीवाना…’ यांसारखी एकाहून एक सरस गाणी सादर झाली.

विशेष आकर्षण ठरले ते ‘डॉन’ चित्रपटाच्या शीर्षकगीताचे जबरदस्त सादरीकरण, ज्यावेळी श्रोत्यांनी जागेवर उभं राहून नाचून प्रतिसाद दिला. ‘मच गया शोर सारी नगरी में…’ या गाण्यावर शिट्ट्या आणि टाळ्यांनी वातावरण दणाणून गेलं.

किल्लेदार दांपत्याची जुगलबंदी:
खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी असलेल्या विजय आणि भारती किल्लेदार यांनी सादर केलेले ‘परदेसीयाँ…’ हे युगुलगीत विशेष गाजले.

मैफलीचा समारोप ‘ना ना नाना रे…’ या जोशपूर्ण द्वंद्वगीताने झाला. संपूर्ण कार्यक्रमभर श्रोत्यांनी प्रत्येक गाण्याला वन्स मोअरची दाद दिली, त्यामुळे गायकांनीही आपले सर्वस्व पणाला लावून सादरीकरण केले.


संजय, दीपक, प्रशांत, निखिल यांनी संयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली. अमित पांचाळ यांनी त्यांच्या रसाळ आणि अभ्यासपूर्ण निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमात रंग भरला.


संगीतप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. बिग बींच्या विविध मूड्सना साजेशी गाणी आणि कलाकारांची सर्जनशील सादरीकरणे यामुळे ‘गाता रहे मेरा दिल’ ही मैफल मनात कायम घर करून राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!