योगेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम :  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


टाकवे बुद्रुक (आंदर मावळ) :सामाजिक बांधिलकी आणि लोकहिताचा आदर्श प्रस्थापित करत टाकवे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन योगेश गायकवाड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खर्चाचा अपव्यय टाळत समाजोपयोगी उपक्रम राबवला. त्यांनी आपला वाढदिवस साजरा करताना कोणताही दिखावा न करता, वरसुबाई माध्यमिक विद्यालय (आंदर मावळ) येथील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप केले.

या उपक्रमांतर्गत  सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शालेय जीवनाबाबत सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त आणि मेहनतीचे मूल्य यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडले आणि सांगितले की, “शिक्षण हेच खरे धन असून यामुळेच व्यक्तिमत्व घडते आणि समाज उन्नत होतो. आपण मिळवलेलं ज्ञान समाजासाठी वापरल्यासच त्याची खरी किंमत ठरते.”

कार्यक्रमामध्ये सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप मालपोटे, माजी चेअरमन दिलीप आंबेकर, मुख्याध्यापक राजेश गायकवाड, तसेच शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच शिंदे, बारस्कर, तुषार पवार, सुनील गायकवाड, रघुनाथ सातकर, बाळासाहेब गायकवाड, अशोक सुपे, अनिल पिंपरकर यांचा सक्रिय सहभाग होता.


मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना योगेश गायकवाड यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की, “समाजातील जबाबदार व्यक्तींनी अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिलं, तर ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेला निश्चितच मोठा हातभार लागेल.”


आजच्या स्पर्धेच्या युगात वाढदिवस वा खास प्रसंगी भव्य पार्टी, फुगे-सजावट, केक आणि खर्चिक कार्यक्रम होणं ही एक सामान्य बाब झाली आहे. पण योगेश गायकवाड यांनी या साच्यातून बाहेर पडत एक समाजोपयोगी आणि प्रेरणादायी वाट निवडली आहे. अशा विधायक उपक्रमांतून समाजातील इतर नागरिकांनाही प्रेरणा घेता येईल.
समाजाचे ऋण फेडण्याचा खरा मार्ग म्हणजे आपल्या कृतीतून समाजाला काहीतरी देणे. योगेश गायकवाड यांच्या या उपक्रमातून तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नक्कीच प्रेरणा घ्यावी, असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!