आषाढी एकादशीनिमित्त  नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान


पंढरपूर : भक्तिभावाची अनुभूती आज पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटेपासून पाहायला मिळाली. लाखो वारकरी आणि भाविकांच्या गजरात पहाटे अडीच वाजल्यापासून टाळ-मृदंगाच्या निनादात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली.


यंदाच्या महापूजेसाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले (वय ५२) आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले (वय ४८) या वारकरी दाम्पत्याची निवड ‘मानाच्या वारकऱ्या’साठी झाली. गेले १२ वर्षे सातत्याने विठ्ठलनामात रंगलेले उगले दाम्पत्य विठ्ठलभक्तीत गुंग झालेलं असून, यंदा त्यांच्या सेवेला शासनाचा गौरव लाभला.


विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी ‘मानाचा वारकरी’ म्हणून नाशिक जिल्ह्यातील वारकऱ्यांनाच हे भाग्य प्राप्त झाले आहे. रांग बंद होण्याच्या वेळी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या पहिल्या वारकरी दाम्पत्यास ‘मानाचा वारकरी’  म्हणून पूजेचा मान दिला जातो, अशी प्रथा आहे.
महापूजनानंतर उगले दाम्पत्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शासकीय सत्कार करण्यात आला. त्यांना एक वर्षासाठी मोफत एसटी प्रवास पासही प्रदान करण्यात आला.


दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात १५ लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली असून चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठीही भाविकांची झुंबड उडाली आहे. दर्शनासाठी मंदिर परिसरात सुमारे ५ किलोमीटर लांब रांग लागली आहे. जवळपास २२ किलोमीटरचा परिसर भक्तगणांनी व्यापलेला दिसतोय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजेनंतर म्हणाले, “पांडुरंग मनातला ओळखणारा आहे. त्याचा आशीर्वाद मिळत राहो, राज्यावरील संकटं दूर व्हावीत, शेतकरी सुखी राहावा, अशी आम्ही प्रार्थना केली.”संपूर्ण पंढरपूर शहर  भक्तीरसात न्हालं आहे. जय जय रामकृष्ण हरिच्या जयघोषात विठ्ठलमय वातावरणात, ‘पुंडलीक वरदा हरि विठ्ठल’चा अखंड घोष आसमंतात घुमतोय. भक्ती, समर्पण आणि सहिष्णुतेचा संदेश देणारा आषाढीचा सोहळा, यंदाही भाविकांच्या हृदयात कायमचा ठसा उमटवून गेला आहे.


रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता व कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली अशी पोस्ट मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर टाकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!