सुमधुर गीतांच्या सुरेल वर्षावात श्रोते चिंब

*
पिंपरी:  विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘यार बिना चैन कहा रे…’ या सुमधुर हिंदी – मराठी गीतांच्या ऑडिओ – व्हिज्युअल नि:शुल्क सांगीतिक मैफलीतील सुरेल वर्षावात श्रोते चिंब झाले.
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, जी. बी. कुलकर्णी, नूतन कुलकर्णी, प्रशांत वैद्य, मोहन भस्मे, विजय सहारे, कांतीलाल जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेशस्तवनानंतर ‘माउली माउली रूप तुझे…’ या भक्तिरचनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

विनायक कदम, नंदकुमार कांबळे, शुभांगी पवार, नेहा दंडवते, मल्लिकार्जुन बनसोडे, विलास खरे, चंद्रकांत हिवरकर, अरुण सरमाने, स्मिता गायकवाड, सचिन जवंजाळ, अश्विनी जवंजाळ, सीमा पोडाला, अनिल जंगम, सतीश कापडी, प्रीती गायकवाड आणि पिनाक भिंगारे या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून चित्रपटसंगीतातील लोकप्रिय आणि अभिजात सुमधुर गीतांचा नजराणा पेश करीत रसिकांची मने जिंकून घेतली.
त्यामध्ये मैफलीत ‘देखा ना हाय रे…’ , ‘ख्वाब हो तुम या…’ , ‘ओ मेरे दिल की चैन…’ , ‘सोला बरस की…’ या एकल स्वरातील गीतांनी श्रोत्यांना मोहित केले.  ‘लागा चुनरी में दाग…’ या शास्त्रीय संगीतावर आधारित सदाबहार गीताच्या पिनाक गायकवाड या युवागायकाने केलेल्या दमदार सादरीकरणाला श्रोत्यांनी वन्स मोअरची उत्स्फूर्त दाद दिली; तर ‘जिसका मुझे था इंतजार…’ , ‘दिल में हैं तू…’ , ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी…’ , ‘कोयल सी तेरी बोली…’ , ‘भिगी भिगी रातों में…’ , ‘प्यार किया नही जाता…’ या युगुलस्वरातील गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
वास्तवात पती – पत्नी असलेल्या जवंजाळ या दांपत्याने ‘यार बिना चैन कहा रे…’ या मैफलीच्या शीर्षकगीताच्या समरसून केलेल्या सादरीकरणाने मैफल खऱ्या अर्थाने रंगतदार  झाली. ‘धीरे धीरे प्यार  को बढाना हैं…’ यासारख्या गीताने श्रोत्यांच्या मनावर मैफलीचा कैफ चढला असतानाच ‘धुंदीत गाऊ…’ या मराठमोळ्या गीताने रसिकांना अक्षरश: धुंद केले. प्रेक्षागृहाबाहेर रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असतानाच ‘ढगाला लागली कळ…’ या धमाल गीताच्या साभिनय सादरीकरणाने श्रोते स्वराभिषेकात चिंब झाले.
त्यानंतर झालेल्या ‘दुनिया में लोगों को…’ या अप्रतिम गीताने पुन्हा एकदा वन्स मोअर मिळविला. कुमार शानू यांच्या गीतांची मालिका मैफलीला कळसाध्यायाकडे घेऊन गेली. ‘यारा हो यारा…’ , ‘सुन बेलियाँ…’ , ‘टिप टिप बरसा पानी…’ , ‘छुप गये सारे नजारें…’ , ‘लाल दुपट्टेवाली…’ , ‘गोरी तेरे अंग अंग में…’ या एकाहून एक सरस गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली; आणि मैफल संपूच नये असे वाटत असतानाच ‘तुम अगर मुझको…’ या मैफलीतील सर्व गायक कलाकारांनी सादर केलेल्या नितांतसुंदर गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

विनायक कदम यांनी संयोजन केले; कार्यक्रमाची संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती.सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. साहिल आणि सानिका कांबळे यांनी संयोजनात सहकार्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. सुहास चांगण यांनी छायाचित्रण केले. आकाश गाजूल यांनी फोटोग्राफी केले. दृश्यनिर्मिती विक्रम क्रिएशनच्या साहाय्याने करण्यात आली. घनश्याम आगरवाल यांनी अभ्यासपूर्ण आणि खुसखुशीत शैलीतून निवेदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!