अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन; देशभरातील सायकलपटूंचा सहभाग

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन; देशभरातील सायकलपटूंचा सहभाग

देहू : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. १९ जुलै रोजी पुणे ते बारामती राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा यंदा नवव्या वर्षात पदार्पण करीत आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी ही माहिती दिली.

स्पर्धेचे आयोजन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने करण्यात आले असून, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने ही स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावर विविध गटांत सायकलपटूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेचे गट:

1. पुणे ते बारामती (१२२ किमी) – राष्ट्रीय स्तर, पुरुष

2. पुणे ते बारामती (१२२ किमी) – राज्य स्तर, पुरुष

3. सासवड ते बारामती (८५ किमी) – MTB खुली स्पर्धा, पुरुष

4. माळेगाव ते बारामती (१५ किमी) – राष्ट्रीय स्तर, महिला

5. सासवड ते बारामती (८५ किमी) – पोलीस व राज्य कर्मचारी (पुरुष)

6. माळेगाव ते बारामती (१५ किमी) – पोलीस व राज्य कर्मचारी (महिला)

या स्पर्धेत देशभरातून ४०० ते ४५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धक, तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत ३०० ते ३५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. नवी दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, बिहार, उत्तराखंड, अंदमान निकोबार, चंदीगड यासह संरक्षण दल व विविध रेल्वे विभागातील खेळाडू सहभागी होतील. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी एकूण ६ लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व गटांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह दिले जाईल. तसेच दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या खेळाडूंना “घाटाचा राजा” हा विशेष पुरस्कारही मिळणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रवास, निवास आणि भोजनाची सुविधा सायकलिंग फेडरेशनच्या नियमानुसार दिली जाईल.

मागील वर्षीचे विजेते:

राष्ट्रीय स्तर (पुणे-बारामती) – मनजित सिंग (एअर फोर्स) (2.33.55), सूर्या थत्तु (2.37.60), श्रीशैल विरापुर (2.39.27)

राज्य स्तर (पुणे-बारामती) – सिद्देश पाटील (2.37.31), हनुमान चोपडे (2.38.29), दत्तात्रय चौगुले (2.38.35)

घाटाचा राजा (राष्ट्रीय) – सूर्या थत्तु

घाटाचा राजा (राज्य) – सिद्देश पाटील

सायकल रॅलीद्वारे जनजागृती:

समाजप्रबोधनासाठी शनिवारवाडा ते हडपसर दरम्यान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य, पर्यावरण, वाहतूक व स्वच्छता या मुद्द्यांवर जनजागृतीसाठी ही रॅली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या उपक्रमात ३००० ते ३५०० विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

उद्घाटन समारंभ:

शनिवारवाडा (सकाळी ८.०० वा.)
उपस्थित मान्यवर:
मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, ओंकार सिंग (Asian Cycling Confederation), मनिंदर सिंग (CFI), पार्थ पवार, संजय साठे इ.

हडपसर (ग्लायडिंग सेंटर, सकाळी ९.०० वा.)
उपस्थित मान्यवर:
उद्योजक सतिश मगर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू दशरथ जाधव, आमदार चेतन तुपे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार महादेव बाबर, उपाध्यक्ष सुरेश घुले, नाना भानगिरे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले व इतर मान्यवर

बक्षीस वितरण समारंभ:

ग.दि.मा. सभागृह, बारामती (दुपारी २.३० वा.)
उपस्थित मान्यवर:
मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुनेत्रा पवार, कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, खा. सुप्रिया सुळे, कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार आणि सहसचिव (प्रशासन) ए.एम. जाधव यांनी नागरिकांना या स्पर्धा आणि रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!