जातीधर्म विसरून एकोपा जपा :  राधाबाई वाघमारे यांचे मोलाचे विचार

जातिधर्म विसरून एकोपा जपा! – राधाबाई वाघमारे यांचे मोलाचे विचार

पिंपरी :  “जाती आणि धर्म या माणसाने निर्माण केलेल्या चौकटी आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीची जपणूक प्रत्येकाने करावी,” असे विचार ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांनी व्यक्त करत सामाजिक समतेचा मोलाचा संदेश दिला.

न्यू इंग्लिश स्कूल, माण (ता. मुळशी) येथे दिवंगत मुरलीधर कंक मास्तर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दिलासा संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास आषाढी एकादशीचे औचित्य लाभले होते. यावेळी राधाबाई वाघमारे यांनी संत कान्होपात्रांचा “येते पंढरीला तुझ्या मी विठ्ठला, सुख-दुःख सारे विसरायला…” हा अभंग सादर केला आणि उपस्थितांना भक्ति आणि एकतेचा अनुभव दिला.

यावेळी लेखक नारायण कुंभार, वेदान्तश्री प्रकाशनचे प्रकाशक सुनील उंब्रजकर, शाळेचे मुख्याध्यापक अंबादास रोडे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, कवी अरुण परदेशी, मुरलीधर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सन २०२५ मध्ये शालान्त परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक – मिसबा शफिक खान, द्वितीय – सुमेध संदीप राणे, तृतीय – हर्षल सतीश वाघमारे, चतुर्थ – ऋतुजा खंडू भांड, पाचवा – गणेश गोपाळ बिरादार. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि रोख शैक्षणिक मदतीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भावनिक कवितेचा स्पर्श

राधाबाई वाघमारे यांनी कवितेतून समतेचा संदेश देताना म्हटले –

> “हिंदू म्हणतात रामराम, मुस्लीम कहते है सलाम,
दोन शब्द भिन्न असले तरी दोघांचाही ईश्वर एकच आहे…”

शाळेतील विद्यार्थी दिंडी, संवाद आणि प्रेरणा

शाळेच्या विद्यार्थ्यांनी पांडुरंगाची आरती आणि भक्तिगीत सादर करत पारंपरिक भक्तिपरंपरेचा अनुभव दिला. कवी शामराव सरकाळे यांनी “चंद्रभागेला भेटण्या चालली इंद्रायणी” हे भक्तिगीत सादर केले. यानंतर सुनील उंब्रजकर यांनी नववीतून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यास, मोबाईल वापर आणि आत्ममूल्यांविषयी प्रश्नोत्तरांचा उपक्रम राबवला.

मुख्याध्यापक अंबादास रोडे यांनी शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संयोजन विजय भांगरे, भीमराव वाढवे, साधना शिंदे, मनीषा मोरे, ज्योती गायकवाड, शीतल टकले, बाळासाहेब जाधव, सुदाम केळकर, बाळासाहेब माने यांनी केले. गोकुळ गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संभाजी थिटे तर आभार प्रदर्शन मंगल गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!