आंदर मावळ व नाणे मावळ भागातील अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण.
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील आंदर मावळ व नाणे मावळ भागातील अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः दाणादाण उडालेली पाहायला मिळत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पाठदुखी, कंबरदुखी अश्या आजारांच्या तक्रारी वाढताना पाहायला मिळत आहे. या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मावळवासीयांची मागणी आहे.
आंदर मावळ व नाणे मावळ हा भाग तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग आहे. या भागामध्ये सुमारे 90 ते 100 गावे छोट्या-मोठ्या वाड्या वस्त्या आहेत. मावळमधील शेती हा प्रामुख्याने मुख्य व्यवसाय असला तरी त्याबरोबर कुक्कुटपालनाचे, फुल उत्पादनाचे व्यवसाय विस्तारले आहेत. आंदर मावळ भाग 60 ते 70 व नाणे मावळ भाग 50 ते 60  किलोमीटर विस्तारला आहे.
नाणे मावळ मधील कचरेवाडी, साई, वाउंड, पारवडी, उकसान, उंबरवाडी, करंजगाव आदी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
तर आंदर मावळ मधील कशाळ,भोयरे, किवळे, इंगळून, पिंपरी, माळेगाव, सावळा, खांडी, कुसूर, कांब्रे, माऊ, दवणेवाडी, फळणे, टाकवे बुद्रुक, आदी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
ह्या रस्त्यांची कामे अनेक वेळा झाली मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने तीन ते चार महिण्यामध्ये रस्त्याला केलेली डागडुजी किंवा केलेले डांबरीकरण पूर्णपणे निघून जात आहे. रस्त्याची परिस्थिती जैसे थे पुन्हा दोन ते तीन महिन्यात निर्माण होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष वसंत असवले यांनी सांगितले.
या भागात काही ठिकाणी दळणवळणाचे प्रमाण कमी जास्त असले, तरी येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत आहे, मात्र प्रशासन ह्याकडे जाणूनबुजून कानाडोळा करीत आहे.यातील काही रस्ते पीडब्ल्यूडी, काही रस्ते पंचायत समिती बांधकाम विभागाकडे असतात. परंतु सद्यस्थितीत दोन्ही विभागातील रस्त्यांची दुरवस्था झालेली पाहायला मिळत असल्याचे सेवा फाउंडेशन अध्यक्ष गणेश गुरव यांनी  सागितले.
दरवर्षी कोट्यावधी रुपये या रस्त्यांसाठी मंजूर होत असतात. परंतु हे कोट्यावधी रुपये शेवटी खड्ड्यातच जातात. दरवर्षी पावसाळ्यात ह्या रस्त्यांची अक्षरशः चाळण होत असते. अश्या रस्त्यांवरून वाहने कशी चालवायची असा सवाल वाहन धारकांकडून विचारला जात आहे. अनेक वेळा मोठे अपघात होऊन अनेकांना हाकनाक जीव गमवावा लागला आहे,रस्त्याची कामे चांगल्या दर्जाची होणे गरजेचे आहे  असे
वाहन चालक स्थानिक नागरिक सुदाम तुर्डे  म्हणाले.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवात  झाडांच्या फांद्या यामुळे साईट पट्ट्या गायब झाल्या आहेत  त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.  वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक अपघाताला निमंत्रण भेटत आहे.   रस्ते बांधकाम विभागामार्फत  रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले झाडांच्या फांद्या व गवत काढण्यात यावे तसेच रस्ते सुव्यवस्थित करण्यात यावेत
असे मत  मानव विकास परिषद मावळ तालुका अध्यक्ष अंजना कदम यांनी व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!