राज्यात प्राथमिक आरोग्य सेवेचे जाळे निर्माण करणार : फडणवीस


वडगाव मावळ: राज्यात प्राथमिक आरोग्य सेवेचे जाळे निर्माण केले जाईल.यासाठी आरोग्य सेवेची पुर्नरचना करून आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला.
आंबी- वारंगवाडी ता. मावळ येथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते.

खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबईचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. विजय पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरचे कुलपती संजय पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबईच्या उपाध्यक्ष तथा उपकुलपती डॉ. शिवानी पाटील, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष, रामदास काकडे,उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीतल नाईकवाडे यांच्या हजारो मावळवासीय उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजना,प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्यात येतात. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात विमा आणि सेवेची खात्री या माध्यमातून गरिबातल्या गरीब रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

राज्यात प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासह द्वितीय स्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत. विशेषोपचारासाठी शासकीय रुग्णालये, विद्यापीठांची आणि खाजगी रुग्णालये आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे.


महाराष्ट्रात शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती आणण्याचे आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात संधी मिळवून देण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील हे एक अग्रणी नाव असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात उच्च शिक्षणाच्या खासगीकरणामुळे डॉ.डी.वाय.पाटील आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींनी संस्था उभ्या केल्या आणि उच्च शिक्षणाचा विस्तार झाला.

त्यामुळे अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. राज्यात सात खासगी विद्यापीठे या कुटुंबाने सुरू केली आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम सुरू केले. गुणवत्तेला धक्का न लावता उत्तम शिक्षण देण्यासाठी डी.वाय.पाटील यांच्या कुटुंबाने चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या वाटचालीत पुष्पलता पाटील यांचे संस्कार महत्वाचे ठरले असल्याने त्यांचे नाव रुग्णालयाला देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!