कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी : शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर जोरदार मोर्चा

कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी — शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर जोरदार मोर्चा
मुंबई :राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य व शांततापूर्ण मोर्चा काढत आपला तीव्र रोष व्यक्त केला. फ्लॉवर ग्रोवर कौन्सिल ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात पारंपरिक फुलउत्पादन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शेतकऱ्यांनी सांगितले की, बाजारपेठेत कृत्रिम फुलांची मागणी झपाट्याने वाढत आहे. परिणामी नैसर्गिक फुलांची विक्री घटली असून उत्पादन खर्च वाढला आहे. या संकटाला सामोरे जात असताना शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने तातडीने कृत्रिम फुलांच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशा आशयाची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनाला राजकीय पातळीवरही मोठा पाठिंबा मिळाला. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी मोर्चाला भेट देत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “कृत्रिम फुलांमुळे पारंपरिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शासन या बाबतीत सकारात्मक आणि तातडीची पावले उचलेल.”

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील मोर्चात हजेरी लावत शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभं राहत सरकारकडे लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की, “फुलशेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर ही पारंपरिक संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे.”

याशिवाय आमदार बाबाजी काळे, महेश शिंदे, शंकर मांडेकर यांच्यासह अनेक शेतकरी नेते आणि प्रतिनिधींनी मोर्चात सहभाग घेतला. शांततेच्या मार्गाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

हा मोर्चा केवळ कृत्रिम फुलांच्या विरोधात नव्हता, तर संपूर्ण पारंपरिक शेतीचे अस्तित्व वाचवण्यासाठीचा संघर्ष होता. आता शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!