तळेगाव दाभाडे : येथील लिलाबाई वसंतराव घोलप यांनी पायी ३ महिने १५ दिवस (१०५ दिवस) नर्मदा परिक्रमा करून परिक्रमेचे पुण्य मिळवले आहे.त्यानिमित्त कन्यापुजनाचा कार्यक्रम आयेजित केला असून ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांचे रविवार २३ मार्चला पाच वाजता प्रवचन होणार आहे.शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे.
थोरला मुलगा पंधरा वर्षांचा आणि धाकटा तेरा वर्षांचा असताना सौभाग्याचे लेणे गेले. आभाळाएवढे दुःख त्यांच्यावर कोसळले. पण, त्यांना कुटुंबीयांनी आधार दिला. लेकरांसाठी दुःख गिळून उठावे लागेल, असा विश्वास दिला. ‘ती’ही लेकरांसाठी उभी राहिली. तिचीच लेकरं ती. आईच्या डोळ्यांत यापुढे कधीच अश्रू येऊ द्यायचे नाहीत म्हणून त्यांनीही कंबर कसली. कधीकाळी दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहण्याचे आणि दुसऱ्यांकडे चाकरी करण्याचे दिवस मुलांच्या मदतीने तिने पलटविले. आज तिच्या मुलांनी दोनशे लोकांच्या हाताला काम दिले आहे.
सुरुवातीच्या काळात लीलाबाई सुखात होत्या. घरदार, शेतीवाडी आणि पती कारखान्याच्या नोकरीत होते, त्यामुळे सुखाचे दिवस आनंदात जात होते संसारवेलीवरील दोन फुले होती. त्यांच्या डोळ्यांत उद्याचे स्वप्न त्या पाहत होत्या. मुलांच्या शिक्षणासाठी आणि पतीच्या नोकरीनिमित्त आंबळे जवळची घोलपवाडी सोडून हे सर्व तळेगाव शहरात रहायला आले. तरीही लीलाबाईंचे नाते शेतीशी कायम घट्ट होते. सुख म्हणजे काय ते हेच असते. याचा अनुभव त्या घेत होत्या. पण, नियतीच्या मनात दुसरेच काही तरी होते.
पतीचे आकस्मिक निधन झाले. मात्र, कुटुंबीयांच्या मदतीने त्या पुन्हा उभ्या राहिल्या, त्यांच्या मुलांचा संतदीप उद्योग समूह मावळात नाव काढतोय. हा उद्योग समूह उभारायला त्यांच्यासह मुलांनी अपार कष्ट घेतले आहेत.लीलाबाई घोलप यांना बहिणी व भावाची साथ लाभली. त्यांचे माहेर तळेगाव स्टेशन. म्हाळस्करवाडीतील ज्ञानेश्वर सखाराम जाधव आणि यमुना ज्ञानेश्वर जाधव यांची ही कन्या. अरुण आशा आणि उषा ही भावंडे. लीलाबाई यांचा विवाह आंबळेजवळील घोलपवाडीतील वसंतराव घोलप यांच्याशी झाला. ते तळेगाव स्टेशनच्या ईगल कंपनीत नोकरीला होते.
तळेगाव स्टेशन पंचक्रोशीतील अनेक तरुण या फॅक्टरीत नोकरी करीत होते. मुलाबाळांना चांगले शिक्षण आणि संगोपन करून शेतीवाडी सांभाळायची, इतकेच बहुतांशी त्यावेळच्या पिढीचे स्वप्न. असेच स्वप्न वसंतराव यांनी पाहिले आणि हे स्वप्न प्रत्यक्षात देखील उतरले. संतोष आणि संदीप ही दोन मुले लहानाची मोठी होऊ लागली. संतोष पंधरा वर्षांचा असतानाच वसंतराव यांचे देहावसान झाले. पुढचा काळ लीलाबाई यांच्यासाठी संघर्षाचा होता; पण या संघर्षात त्यांच्या बहिणी आणि भावाने साथ दिली.शेतीबरोबरच शिवणकाम केले.मुळात कष्टाची कोणतीच फिकीर नसलेल्या लीलाबाई शेतात राबत होत्या. सासरे खंडू घोलप आणि सासू सरूबाई घोलप यांनी सुनेला अंतर दिले नाही, तेही तिच्यावर लेकीप्रमाणे माया करत. शेतीच्या सोबतीने लीलाबाई शिवणकाम करीत.
तळेगाव स्टेशन येथे बांधलेल्या घरात भाडेकरू ठेवून त्या मात्र साध्या घरात राहत. लीलाबाई यांच्यामुळे मुलगा संतोष याच्यावरदेखील कष्ट करण्याचे संस्कार झाले. शाळा शिकताना त्याने अवघ्या दोन लिटरपासून दूधविक्रीचा व्यवसाय सुरू केला.दोनाचे पाच, दहा, पंचवीस, शंभर, पाचशे, हजार, तीन हजार लिटरपर्यंत हा व्यवसाय त्यांनी वाढवला. अर्थात, त्या कामाच्या पाठीशी आई आणि मामा भक्कमपणे उभे होते. याच काळात संतोष आणि संदीप रात्री दहा ते दोनपर्यंत महामार्गावर चहा विकण्याचे काम करायचे.
वडगाव फाट्याजवळ संतोष आणि त्याचा भाऊ दोघे रात्री चहा विकायचे. लांब पल्ल्याचे ट्रक, टेम्पोचालक येथे चहा पिऊन जायचे.दूध – चहा विकून, शेती पिकवून गाठीला दोन पैसे राहू लागले. संतोष हे तीन हजार लिटर दुधाची विक्री करायचे आणि दुधापासून दही, तूप, लोणी करून त्याची लीलाबाई या विक्री करायच्या. दिवसभर मिळालेले उत्पन्न आईकडे जमा करायचे. हाती दोन पैसे मिळू लागल्याने घोलप परिवाराने सुरुवातीला रिक्षा टेम्पो, सहा आसनी रिक्षा, ट्रॅक्टर अशी वाहने घेतली. संतोषचे वय वाढत होते. संतोषने जेसीबी मशिन घेऊन डेव्हल्पमेंटची कामे घ्यायला सुरुवात केली.आणि बघता बघतासंतदीप स्टोन क्रशर, संतदीप आरएमसी हा उद्योग समूह भरभराटीला आला. आज या दोन्हीही उद्योग समूहांत दोनशेहून अधिक जण काम करीत आहेत. इतक्या जणांच्या हाताला त्यांनी काम दिले. रोजगार मिळाल्याने त्यांच्या सभोवताली माणसांचे कायम मोहोळ आहे.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या मुलांनी उभा केलेला उद्योग सर्वांचीच मान ताठ करणारा आहे. मावळ तालुक्याला संतांच्या भूमीचे वरदान आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यावर येथील नागरिकांची श्रद्धा आहे, तशी घोलप परिवाराचीही आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा पगडा आहे.

error: Content is protected !!