नारायण सुर्वे यांचे साहित्य मराठीतील एक स्मरणशिळा : प्रा. डॉ. राजा दीक्षित
पिंपरी:”नारायण सुर्वे यांचे साहित्य मराठीतील एक स्मरणशिळा आहे!” असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी काढले.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलन आणि पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान स्वीकारताना प्रा. डॉ. राजा दीक्षित बोलत होते.
नारायण सुर्वे ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोहर पारळकर अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ कविवर्य प्रा. डॉ. विठ्ठल वाघ, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल (पद्मश्री नारायण सुर्वे विचार साधना पुरस्कार), चिंचवड येथील थरमॅक्स कामगार संघटना (पद्मश्री नारायण सुर्वे उत्कृष्ट औद्योगिक संबंध पुरस्कार) या संस्थांना आणि कवयित्री ललिता सबनीस (मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान), कवी चंद्रकांत वानखेडे (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सिन्नर येथील किरण भावसार (‘घामाचे संदर्भ’), यवतमाळ येथील सचिन शिंदे (‘पातीवरल्या बाया’), बेळगाव येथील बाळासाहेब पाटील (‘घामाची ओल धरून’) या साहित्यकृतींना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. राजा दीक्षित पुढे म्हणाले की, “तुकोबांचा आत्मविश्वास घेऊन नारायण सुर्वे ‘ऐसा गा मी ब्रह्म’ असे म्हणत. त्यांचा स्नेह मला लाभला; आणि आता सन्मानाने अधिकच नम्र व्हायची संधी दिली आहे!” याप्रसंगी “नारायण सुर्वेंची कविता कामगाराच्या घामाशी अन् रक्ताशी एकरूप होणारी आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. चंद्रकांत वानखेडे यांनी सुर्वे यांची “…असं पत्रात लिवा…” ही कविता सादर केली; तर ललिता सबनीस यांनी, “कृष्णाबाईंच्या नावाचा पुरस्कार म्हणजे आईच्या नावाचा पुरस्कार!” अशी भावना व्यक्त केली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी सन्मानार्थी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
साहित्य पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींनी आपल्या कवितांचे प्रभावी सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले; तर प्रा. डॉ. विठ्ठल वाघ यांनी आपल्या ‘अजून’ या कवितेच्या माध्यमातून श्रोत्यांना अंतर्मुख केले. मनोहर पारळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “सामंजस्यातून शक्ती, समृद्धी अन् प्रगती होते!” असे मत मांडले.
राजेंद्र वाघ यांनी गायलेल्या “डोंगरी शेत माझं गं…” या सुर्वेंच्या कवितेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला; तर वर्षा बालगोपाल यांनी सुर्वेंची “कवितेऐवजी रद्दी विकली असती तर…” ही कविता सादर केली. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले. मानसी चिटणीस यांनी पुरुषोत्तम सदाफुले लिखित मानपत्राचे वाचन केले. तसेच संगीता झिंजुरके यांनी आपल्या “वाद नसाया पाहिजे…” या गीताचे सुरेल सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या संयोजनात बाजीराव सातपुते, प्रभाकर वाघोले, अरुण गराडे, फुलवती जगताप, प्रा. प्रभाकर दाभाडे, प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.