तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांच्य संपत्तीची चौकशी होणार    तळेगाव दाभाडे:नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या अवैध संपत्तीबाबत आलेल्या तकारींचा विचार करून, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडून त्याबाबत चौकशी केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर ते बोलत होते.

आमदार शेळके म्हणाले, “मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचा कारभार अत्यंत वादग्रस्त होता. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही त्यांच्या विरोधात तक्रार होती. महिलाकर्मचाऱ्यांशी ते असभ्य भाषेत बोलत होते. कार्यालयीन वेळेत ते मद्यप्राशन करून येत होते.

 त्यांनी १ जून २०२४ रोजी मद्यप्राशन करून गाडी चालवत एका मोटारीला धडक दिली होती. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आमदार शेळके यांनी केलेल्या तक्रारीवर मंत्री सामंत म्हणाले, “संबंधित वादग्रस्त अधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, महिलांना एसएमएस करणे या सर्व बाबीची गंभीर दखल घेऊन, त्यांचे निलंबन केले आहे. तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.

error: Content is protected !!