पिंपरी : “उत्तम वैचारिक बैठक हा आनंदी जीवनाचा पाया असतो. यासोबतच सुसंवाद, हास्यविनोद, आरोग्य आणि सद्सद्विवेक या गोष्टींच्या समन्वयातून जीवन आनंदी होऊ शकते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी विरंगुळा केंद्र, पागेच्या तालमीसमोर, चिंचवडगाव येथे केले. 

ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवन’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना राजेंद्र घावटे बोलत होते. माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन तसेच रत्नप्रभा खोत आणि मंगला दळवी यांनी केलेल्या त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, “आपले सर्वांचे जीवन आनंदी आणि सुंदर होण्यासाठी मूलभूत गोष्टींचा ऊहापोह व्हावा म्हणून आवर्जून या व्याख्यानाचे आयोजन केले आहे!” अशी माहिती दिली. ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी, “माझ्या वैयक्तिक जडणघडणीत ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेचा मोलाचा वाटा आहे!” अशी कृतज्ञता व्यक्त केली. राजेंद्र भागवत आणि  प्रा. मोहन बेदरकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, “आनंदी देशांच्या निर्देशांकात जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक १४० वा होता; तर भूतानसारखे गरीब अन् चिमुकले राष्ट्र खूप वरच्या क्रमांकावर होते. वास्तविक सांस्कृतिक समृद्धी, गौरवशाली परंपरा, संतांची मांदियाळी असा इतिहास असल्याने भारतभूमीत आणि विशेषत: महाराष्ट्रात जन्माला येणे, वास्तव्य करणे हे परम भाग्याचे लक्षण मानले जात होते. भौतिक सुविधांमध्ये आनंद शोधण्याच्या वृत्तीमुळे आपण शाश्वत आनंदाला वंचित झालो आहोत.

 माणसाला जीवनात अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागते. दुःखद प्रसंग येतात; पण त्याचबरोबर सुखाचे क्षण वाट्याला येतात. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक हे अनुभवसंपन्न आणि ज्ञानाने परिपक्व होतात. गरजूंना मदत, पर्यावरणाचे संवर्धन, रुग्णांची शुश्रूषा, कुटुंबाला आणि समाजाला मार्गदर्शन अशा कामांमधून आत्मिक समाधान मिळवता येते. नकारात्मक मानसिकतेतून आयुष्याचे खच्चीकरण होते; तसेच जन्मासोबतच मृत्यू आयुष्यभर साथ करतो म्हणून त्याचे भय बाळगून वर्तमान क्षण दुःखात घालवणे योग्य नाही. त्यापेक्षा या जन्मावर अन् या जगण्यावर शतदा प्रेम करून दीपस्तंभ होऊन आनंदाने जगा!” असे विचार संतवचने, अभिजात साहित्यातील उद्धरणे, मदर तेरेसा, बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ यांचे संदर्भ उद्धृत करीत घावटे यांनी लालित्यपूर्ण शैलीतून विषयाची मांडणी केली.

गोपाळ भसे, नंदकुमार मुरडे, नारायण दिवेकर, सतीश कुलकर्णी, सुधाकर कुलकर्णी, सुदाम गुरव, चंद्रकांत पारखी, उषा गर्भे, शामकांत खटावकर, मंदाकिनी दीक्षित, सुनील चव्हाण यांनी संयोजनात सहकार्य केले. शहाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले.

You missed

error: Content is protected !!