संविधानाचा सर्वाधिक सन्मान पंतप्रधान मोदी यांनीच केला – अमर साबळे

पिंपरी:  लोकशाही धोक्यात आहे, मोदी राज्यघटना बदलणार, असा कांगावा करणाऱ्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांना आलेला राज्यघटनेचा पुळका म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’ आहे, अशी जोरदार टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीमध्ये वारंवार करण्यात येत असलेल्या आरोपांना साबळे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तरे दिली तसेच विरोधकांवर पलटवारही केले. त्यावेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर तसेच धनराज बिर्दा, संजय मंगोडेकर, मनोज तोरडमल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्या, निवडणुकीत पराभव करणाऱ्या काँग्रेसनेच राज्यघटनेत सर्वाधिक दुरुस्त्या करून राज्यघटनेची पायमल्ली केली आहे. काँग्रेसने राज्यघटनेच्या चौकटीस धोका निर्माण झाला होता, असा आरोपही साबळे यांनी केला.

साबळे म्हणाले की, संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी यांची लाट आहे. त्यामुळे विरोधकांची धाबे दणाणले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे गोबेल्स नीतीचा वापर करून ते समाजात खोटी माहिती पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणताही आधार नसलेले, दिशाभूल करणारे खोडसाळ आरोप करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो. 

डॉ. आंबेडकर व संविधान याविषयी विरोधकांना आलेला पुळका म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’च म्हणावे लागेल, अशी टिप्पणी साबळे यांनी केली. डॉ. आंबेडकर यांना दोनदा पराभूत करण्याचे पाप काँग्रेसने केले होते. संसदेत घटनेच्या शिल्पकाराचे साधे तैलचित्र लावण्याचे सौजन्य देखील कधी काँग्रेसने दाखवले नव्हते किंवा डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा यावेळी त्यांच्या मनाला शिवला नव्हता. भाजपच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांचे तैलचित्रही संसद भवनात समारंभपूर्वक लावण्यात आले, अशी माहिती साबळे यांनी दिली.

काँग्रेसने अनेक वेळा घटनादुरुस्त्या करून राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीची मोडतोड केली आहे, असा आरोप करून साबळे म्हणाले की, 42 व्या घटनादुरुस्तीने आणीबाणी लागू करण्याची तरतूद करण्यात आली. 43 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत बदल करून धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द घुसडण्यात आले. संविधान बदलण्याचे पाप काँग्रेसनेच केले आहे. संविधानाबद्दलचे त्यांचे प्रेम हे नाटकी आहे. त्यांच्या विषारी प्रचारापासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे. 

पंतप्रधान मोदी यांनी संविधानाचा सर्वाधिक सन्मान केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हत्तीवर अंबारीत संविधान ठेवून त्याची मिरवणूक काढली होती. मोदी सरकारच्या पुढाकारानेच संविधान दिन देखील साजरा करण्यास सुरुवात झाली. केवळ डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे चहा विकणारा साधा माणूस आज देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. स्वतः राज्यघटनेचे लाभार्थी असल्यामुळे मोदी यांच्या मनात संविधानाविषयी नितांत श्रद्धा आहे. डॉ. आंबेडकर यांनी दुसरा जन्म घेतला तरी त्यांनाही राज्यघटना बदलणे शक्य नाही. 

‘संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे, संविधान हेच आमच्यासाठी गीता, कुरण व बायबल आहे’, ‘मनुस्मृतीच्या नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर देशाचा कारभार चालेल’, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यांचा साबळे यांनी संदर्भ दिला. संविधानापुढे नतमस्तक होणारे मोदी कधीही संविधान बदलू शकत नाहीत. जगभरातून मान्यता व प्रेम मिळालेले पंतप्रधान पोटतिडकीने ही गोष्ट वारंवार सांगत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी काँग्रेसच्या भंपक अपप्रचारावर विश्वास ठेवणार का, असा सवाल साबळे यांनी केला.

भारताला हिंदुराष्ट्र बनवणे, ही भाजपची भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. आंबेडकर यांची वास्तव्य असलेल्या वास्तू आणि त्यांची कार्यालय तसेच त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांची ठिकाणे स्मारकांमध्ये रूपांतरीत करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार करत आहे. आंबडवे हे बाबासाहेबांचे जन्मगाव खासदार असताना आपण दत्तक घेतले. त्या ठिकाणी देखील त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

You missed

error: Content is protected !!