महायुतीच्या उमेदवारा मागे उभे राहू: आमदार सुनील शेळके यांची भूमिका
वडगाव मावळ:
मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी आमचा आग्रह होता. महायुतीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे स्वागत करून उपमुख्यमंत्री पवार यांच्या आदेश मानून आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहू, असे स्पष्टीकरण आमदार सुनील शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
आमदार शेळके यांनी गेल्या तीन चार महिन्यांपूर्वीच खासदार बारणे यांनी आधी केलेल्या कामाचा अहवाल द्यावा व मगच उमेदवारी मागावी, असे थेट आव्हान देत एकप्रकारे खासदार बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तसेच, मावळ मतदारसंघात असलेली राष्ट्रवादीची ताकद महायुतीच्या नेत्यांपुढे मांडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आठवड्यापूर्वी माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मावळ तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही खासदार बारणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करत माजी मंत्री भेगडे यांना संधी द्यावी अन्यथा आम्ही मतदानच करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे मावळ तालुक्यातून बारणे यांना तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, गुरुवारी शिवसेनेने खासदार बारणे यांची उमेदवारी जाहीर केली असताना आमदार शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करूनमहायुतीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार जो आदेश देतील त्यानुसार आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहू, असे स्पष्ट केले.
आमदार शेळके म्हणाले, मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे चार महिन्यांपासून मी स्वतः हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी आग्रही भूमिका घेऊन प्रयत्न केले, यासंदर्भात महायुतीतील सर्व नेत्यांकडे मागणीही केली. परंतु शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे, तसेच मावळ तालुक्याला ज्यांनी भरभरून दिले त्या अजित पवारांना साथ देणेही महत्वाचे आहे. त्यामुळे महायुतीचे नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे स्वागत करू असेही त्यांनी स्पष्ट केले व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांमध्ये खंबीरपणे उभे राहतील असेही स्पष्ट केले.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित