राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही:अरविंद दोडे
पिंपरी:
“राजकीय इच्छाशक्तीशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अरविंद दोडे यांनी भारतमाता भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवड येथे केले.
समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आयोजित साहित्य संवाद या उपक्रमात ‘मराठी भाषा’ या विषयावर अरविंद दोडे बोलत होते. पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय मराठी विभागप्रमुख प्रा. विद्यासागर वाघिरे, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा कार्यवाह डॉ. संजय जगताप, समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष उज्ज्वला केळकर, सीताराम सुबंध यांची प्रमुख उपस्थिती होती.
अरविंद दोडे यांनी विविध संदर्भ उद्धृत करीत मराठी भाषेतील पहिले छापील पुस्तक, पहिला व्याकरण संग्रह, पहिली जाहिरात, पहिला छापखाना, पहिला मॅट्रिक उत्तीर्ण विद्यार्थी, विद्रोही लेखन करणारी पहिली महिला, पहिले शालेय ग्रंथालय अशा अनेक गोष्टींची रंजक माहिती देऊन ते पुढे म्हणाले की, “पहिलीपासून मराठी सक्तीची करावी अशी विद्वानांनी शिफारस करूनही राजकीय नेत्यांनी अमराठी मतांच्या अभिलाषेपोटी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रमाणभाषेसोबतच बोलीभाषांचे संवर्धन करणे गरजेचे आहे!” प्रा. विद्यासागर वाघिरे यांनी, “सुरेश भट यांच्या प्रोत्साहनामुळे वृत्तबद्ध गझललेखनाकडे वळलो!” असे नमूद करून आपला लेखनप्रवास कथन केला.
डॉ. संजय जगताप यांनी, “महाराष्ट्रातील वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक शाळेत आठवड्यातून दोन तास वाचन उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. साहित्यिकांनी परिसरातील शाळांना आवर्जून भेट द्यावी!” असे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ कवी देवदत्त साने यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले. त्यामध्ये भरत बारी, सुनीता बोडस, रूपाली देव, अभिषेक मिटके, आत्माराम हारे, संजय खोत, राजेश चौधरी, आदेश कोळेकर, गणेश भुते, अभिजित काळे, अरुण कांबळे, हरिश मोरे, प्रदीप गांधलीकर, प्रा. प्रभाकर दाभाडे, सुरेश कंक, नंदकुमार मुरडे, नितीन हिरवे यांनी सहभाग घेतला. कैलास भैरट यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.
शोभा जोशी, सुहास घुमरे, नीलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, वेदान्ती घुमरे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. मानसी चिटणीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जयश्री श्रीखंडे यांनी आभार मानले.


error: Content is protected !!