“सुखाचा दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा: ह. भ. प. किसनमहाराज चौधरी
शब्दधन काव्यमंचाचा उपक्रम ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी
पिंपरी:
“गळ्यात सोन्याचा दागिना घालून मिरविण्यापेक्षा सुखाचा दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा!” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रवचनकार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी पसायदान, एकता कॉलनी, आकुर्डी प्राधिकरण येथे केले.
शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या विशेष उपक्रमांतर्गत किसनमहाराज चौधरी यांना सांगवी येथील श्री गजाननमहाराज सर्व सेवा न्यासचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बब्रुवाहनमहाराज वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त करताना ह. भ. प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “हा जीवनातील आनंदाचा क्षण आहे. ‘करुनी सायास शिकविती…’ या संतवचनाला जागून सुमारे ३८ वर्षे अध्यापन केले. सेवाकाळात माझे सुमारे १५८ विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन उच्चपदस्थ झाले, याचे खूप समाधान वाटते. शिक्षकांनी केवळ चार भिंतींच्या आत शिकविण्यासोबतच समाजाला आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ दिला पाहिजे.
त्यामुळे सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त वेळा विविध विषयांवर प्रवचनसेवा घडली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर १३ पुस्तकांचे लेखन हातून घडले. ‘पसायदान’ या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत; तसेच धार्मिक विषयांवर लेखन प्रकाशित झाले आहे. ०५ सप्टेंबर २००० रोजी तत्कालीन राष्ट्रपतींकडून ‘आदर्श शिक्षक’ हा सन्मान प्राप्त झाला.
त्यानंतर आता आपल्याकडून समाजाला देण्याची वेळ आली आहे, हे अंतर्मुख होऊन विचार करताना जाणवले. त्यामुळे सेवानिवृत्तीपश्चात वृद्धसेवा केंद्र, समुपदेशन, संतसाहित्य अभ्यास केंद्र असे उपक्रम जन्मगावी सुरू केले आहेत. जीवनाविषयी मी कृतार्थ आहे!” ह. भ. प. बब्रुवाहनमहाराज वाघ यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “वेषांतर करून साधू होता येत नाही; तर सत्कर्म केल्याने संतत्व प्राप्त होते. आज साहित्यिकांच्या मांदियाळीत अध्यात्म आणि संस्कृती संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले!” अशी भावना व्यक्त केली.
ज्ञानेश्वरी आणि गाथा या ग्रंथांचे पूजन करून तसेच नलिनी सुरगुडे यांनी गायलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तानाजी एकोंडे यांनी तुकोबांच्या अभंगाचे गायन केले. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार मुरडे, राधाबाई वाघमारे, नितीन हिरवे, शोभा जोशी, सुरेश कंक यांनी किसनमहाराज चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आपल्या मनोगतातून मांडले.
ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, अशोकमहाराज गोरे, शिवाजीराव शिर्के, फुलवती जगताप, रघुनाथ पाटील, जयश्री श्रीखंडे, बाजीराव सातपुते, एकनाथ उगले, हेमंत जोशी, कैलास भैरट, सुभाष चटणे, आनंद मुळूक, कांचन नेवे, मनीषा उगले, राजेंद्र पगारे, श्रीराम शिंपी यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
मुरलीधर दळवी, मालती चौधरी, अपेक्षा चौधरी, निखिल चौधरी, अनिका, ग्रीष्मा, भावार्थ सुरगुडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!