डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिवराज्याभिषेक ‘वर्ष ३५०’ सोहळ्याचे आयोजन
पिंपरी :
डाॅ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डाॅ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी येथे शिवराज्याभिषेक – वर्ष ३५० सोहळ्यास मंगळवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष डाॅ. पी. डी. पाटील आणि सचिव डाॅ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले; तसेच डाॅ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या विश्वस्त डाॅ. रोहिणी सोमनाथ पाटील यांच्या हस्ते शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्या आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नीता मोहिते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील,  दुर्ग अभ्यासक नीलेश गावडे आणि मनोज काकडे, प्रा. विद्या बावीस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात शस्त्रास्त्र प्रदर्शन तसेच किल्ले बनवा, निबंध व वक्तृत्व या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि राजगड दुर्गभ्रमण व स्वच्छता अभियान अशा उपक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. प्रथमवर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी श्रेयस कवडे याने चितारलेले २० फूटी उंचीचे शिवछत्रपतींचे चित्र हे सर्वांसाठी आकर्षण ठरले आहे. विविध महाविद्यालयांतून अनुक्रमे
वक्तृत्व स्पर्धेसाठी ५६, निबंध स्पर्धेसाठी १५० आणि किल्ले बनवा स्पर्धेसाठी १५ अशा संख्येमधे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला आहे. तसेच महाविद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना घेऊन राजगड दुर्गभ्रमण आणि स्वच्छता मोहिम हा या सोहळ्यातील एक उपक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत. दुर्ग अभ्यासक नीलेश गावडे आणि मनोज काकडे यांनी दुर्गपरीक्षण केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने या प्रसंगी शिवराज्याभिषेक पोवाडा सादर केला.

डॉ. रोहिणी पाटील यांनी, “अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमधे छत्रपती शिवरायांचा आदर्श घालून देण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत!” अशी भावना व्यक्त केली; तर बागेश्री मंठाळकर यांनी, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची आठवण करून देणारे हे सोहळे फक्त टीकमार्क स्वरूपाचे करणे आज योग्य ठरणार नाही; तर महाराजांच्या विचार आणि आचाराचा अवलंब करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेच्या प्रसंगातून महाराजांनी घालून दिलेला मातृसन्मानाचा आदर्श आचरणात आणण्याची आत्यंतिक गरज आहे!” असे प्रतिपादन केले. व्हिएतनामच्या राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेतली आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला माघार घेण्यास भाग पाडले. शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केले असते असे गौरवोद्गार व्हिएतनाम राष्ट्रपतींनी काढल्याचे सांगून परकीय व्यक्तींना महाराजांच्याप्रती एवढा आदर असेल तर प्रत्येक भारतीयाला तो असायलाच पाहिजे असेही मंठाळकर म्हणाल्या. महाविद्यालयाने हा सोहळा शासन परिपत्रकाच्या अपेक्षेपेक्षा वरच्या पातळीवर जाऊन आयोजित केला असल्याचे सांगून महाराजांच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी स्तुत्य असे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

डाॅ. रणजित पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. डाॅ. नीता मोहिते यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ सदस्यांनी आयोजनात परिश्रम घेतले. प्रा. विद्या बावीस्कर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!