ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू: आमदार अण्णा बनसोडे
पिंपरी:
“ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा समाजाला खूप उपयोग होतो. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू!” असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले.
तर “ज्येष्ठांनी स्वतःसाठी वेळ काढावा; कारण आजच्या धकाधकीच्या काळात घरीदारी ज्येष्ठांना आजी – आजोबांची भूमिका पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांनी विरंगुळा केंद्रात मन रमवावे!” असे आवाहन विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवड येथे केले. आमदार अण्णा बनसोडे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, राजाभाऊ गोलांडे, ॲड. संदीप चिंचवडे, अजित गव्हाणे, सचिन वाल्हेकर, विक्रांत लांडे, शैला मोळक, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, उपाध्यक्ष अशोक नागणे, सचिव रवींद्र कुलकर्णी, खजिनदार रवींद्र झेंडे, कार्यकारिणी सदस्य शशांक देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विरंगुळा केंद्राच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर खेडकर यांनी प्रास्ताविकातून, “‘आनंद घ्यावा, आनंद द्यावा!’ हे ब्रीद घेऊन आनंद ज्येष्ठ नागरिक संघ वाटचाल करीत आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी संघाला नेहमीच मदतीचा हात दिला. आज संघाची स्वतःची वास्तू झाली त्याचा अवर्णनीय आनंद झाला आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.
दीपप्रज्वलन आणि श्रीराम, गणपती यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. वंदना बोरकर, सरिता कुलकर्णी, सरिता पाळंदे यांनी शारदास्तवन म्हटले; तर उमा पाडुळकर यांच्या महिला समूहाने स्वागतगीताचे गायन केले. कार्यक्रमानंतर सर्व सभासदांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
नृसिंह पाडुळकर, शशिकांत पानट, श्रीकांत कुलकर्णी, ज्ञानोबा कुसळ, प्रदीप वळसंगकर, शाम ब्रह्मे, सुनंदा माटे, कविता कोल्हापुरे, मधुरा गाडगीळ, अश्विनी कोटस्थाने, अशोक कपोले यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रिया जोशी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!